उटा संघटनेची जोरदार मागणी : अकरा तालुक्यात 15 रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती,फोंडय़ातील राजीव गांधी कला मंदिरात समारोप सोहळा
प्रतिनिधी /फोंडा
अनुसुचित जमात (एसटी) बांधवांची सर्वाधिक लोकसंख्या खेडोपाडी डोंगरमाथ्याशी कुशीत वसलेली आहे. सरकारने वन्य क्षेत्रासाठी ईको सेन्सेटिव्ह झोन, बफर झोन व वाघ्र क्षेत्राच्या मर्यादा लागू केल्यास एसटी बांधवांना जबर फटका बसणार आहे. शैक्षणिक व राजकीय आरक्षणासह वन कायद्यात एसटी बांधवांच्या हितासाठी सरकारने प्रयत्न करीत तोडगा काढावा अशी मागणी युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे, उटाचे सचिव दुर्गादास गावडे, अनिल गावकर, दया गावकर, नानू बांडोळकर, मोलू वेळीप, विद्यार्थी संघटनेचे नेहाल गावडे उपस्थित होते. वेळीप यांनी देशभरातून गोवा या एकमेव राज्यात एसटी, एससी, ओबीसीना शैक्षणिक आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्याचे सांगितले. समाजबांधव सुमारे 15 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहिलेले असून हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. विधानसभा निवडणूकीतील राजकीय आरक्षणासाठी उटातर्फे सन 2007 पासून प्रयत्न सुरू असून त्यानंतर 2012, 2017 व 2022 च्या विधानसभा निवडणूका झाल्यात तरीही 12 टक्के असलेल्या एसटी समाजाला राखिवतेची मागणी दुर्लक्षित ठेवून अन्याय केला असल्याचा आरोप वेळीप यांनी केला.
ईको सेन्सेटिव्ह झोनचा पाच तालुक्यांना सर्वाधिक फटका
राज्यातील वन क्षेत्रात ईको सेन्सेटीव्ह झोन, वाघ्र क्षेत्र, बफर झोनसारख्या मर्यादा लागू झाल्यास रानावनात 56 गावात वास्तव्यास करीत असलेल्या अनुसुचित जमातबांधावाना सर्वाधिक फटका बसणार आहे. 1461 चौरस किलोमिटर जागा इको सेन्सिटिव्ह झोनखाली येणार असून काणकोण, सांगे, धारबांदोडा, सत्तरी तालुक्यातील समाजबांधवांसाठी अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. या विषयावर विचारविनियमासाठी उटातर्फे रविवार 13 रोजी सकाळी वाडे-सांगे येथे महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती वेळीप यांनी दिली.
उटातर्फे अकरा तालुक्यात 15 रोजी बिरसा मुंडा जयंती
उटा संघटनेतर्फे आदिवासी समाजाचे भूषण म्हणून परिचित असलेल्या स्वातंत्र्यसेनानी भगवाग बिरसा मुंडा यांची जयंती मंगळवार 15 नोव्हे रोजी सकाळी 10 वा. अकरा तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. काणकोणे तालुक्यात बड्डे-खोतीगाव येथे उटाचे पदाधिकारी दया गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, केपे येथील दयानंद बांदोडकर हायस्कूलच्या सहाय्याने, सांगे येथे वासुदेव मेंग गावकर यांच्या सहकार्यांने गुरूकुलात, धारबांदोडय़ात अनिल गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोले येथील अटल बिहारी वाजपेयी विद्यालयात, तिसवाडीत भालचंद्र उसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करमळी पंचायत सभागृहात, सत्तरी तालुक्तातील सुर्यकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली होंडा येथे, मुरगाव तालुक्यात कुट्टाळी ऍथनी वाझ यांच्या नेतृत्वाखाली मॅथ्यूज सभागृहात, सासष्टी तालुक्यात राय येथील रूमाल्डो यांच्या कार्यालयात होणार आहे. सोहळय़ाची सांगता फोंडा तालुक्यातील कार्यक्रमाने होणार आहे. राजीव गांधी कला मंदिर येथे 15 रोजी दुपारी 3 वा. जयंती साजरी करण्यात येणार आहे. तसेच ज्ञातीबांधवांच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कुट्टाळीचे आमदार ऍथनी वाझ उपस्थित राहणार आहेत. उटाच्या आंदोलनात हुतात्म्य पत्करलेल्या मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांनाही आदरांजली वाहण्यात येणार आहे. बिरसा मुंडाच्या कार्याची महती समाजातील युवा बांधवांनी कळावी याहेतू ज्ञातीबांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उटा संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केले आहे.









