हा गुजराथी पदार्थ आहे. शेव व टोमॅटोची भाजी असा याचा मराठीत सरळसरळ अर्थ होऊ शकतो. शेव व फरसाणाने टोमॅटोच्या भाजीची सजावट केली जाते. गुजरात व राजस्थानमध्ये प्रत्येक ढाब्यावर हा पदार्थ चवीने खाल्ला जातो. आपणही हा पदार्थ घरच्या घरी बनवून पाहूया.
साहित्यः 1 वाटी शेव, 3 मध्यम टोमॅटो साधारण मध्यम आकारात फोडी करून, 2 चमचे गूळ किंवा साखर, मूठभर कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 चमचे तेल, 1 चमचा आले बारीक चिरलेले, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे धणे जिरे पावडर, 1 चमचा काश्मिरी मिरचीपूड, 1 चमचा लाल मिरचीपूड, अर्धा चमचा हळदपूड, अर्धा चमचा गरम मसाला व चवीपुरते मीठ
कृतीः पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, आले घालून परतून घ्या. यानंतर टोमॅटोच्या फोडी, अर्धी वाटी पाणी घालून ढवळून घ्या. यात काश्मिरी मिरचीपूड, लाल मिरचीपूड, हळद, धने जिरे पूड व मीठ घालून ढवळा. गूळ किंवा साखर घालून झाकण ठेवा. दोन तीन मिनिटे झाल्यानंतर उकळी फुटली की गॅस मंद करून पाच मिनिटे शिजू द्या. यामध्ये गरम मसाला घालून पुन्हा उकळी काढा. गॅस ऑफ करून शेव व कोथिंबीर थोडी घाला. बाऊलमध्ये काढून यावर शेव किंवा फरसाणही चालेल, बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून चपाती, रोटी किंवा पराठ्यासोबत खाण्यास द्या.