पॉल स्टर्लिंग, बलबिर्नी यांची शतके, मॉर्गनचे शतक वाया, यंगचे तीन बळी
वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन
इंग्लंड व आयर्लंड यांच्यात झालेला तिसरा रोमांचक वनडे सामना आयर्लंडने केवळ एक चेंडू बाकी ठेवत जिंकला. मात्र इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करीत 49.5 षटकांत सर्व बाद 328 धावा जमवित आयर्लंडसमोर मोठे आव्हान ठेवले होते. पण पॉल स्टर्लिंग व बलबिर्नी यांच्या शानदार शतकांच्या बळावर आयर्लंडने एक चेंडू बाकी असताना 7 गडय़ांनी रोमांचक विजय साकार केला. सामनावीराचा मान मिळविलेल्या स्टर्लिंगने 128 चेंडूत 9 चौकार, 6 षटकारांच्या मदतीने 142 धावा फटकावल्या. अँड्रय़ू बलबिर्नीनेही शतकी (113) खेळी करीत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी 214 धावांची भागीदारी केली. स्टर्लिंगचे हे 119 व्या सामन्यातील नववे वनडे शतक होते तर बलबिर्नीचे सहावे शतक होते. बलबिर्नीने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. हॅरी टेक्मटर (नाबाद 29) व केविन ओब्रायन (नाबाद 21) यांनी चौथ्या गडय़ासाठी नाबाद 50 धावांची भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकून मालिकाविजय याआधीच निश्चित केला होता. त्यामुळे या सामन्याला केवळ औपचारिक महत्त्व राहिले होते. इंग्लंडच्या डावात कर्णधार मॉर्गनने शतकी खेळी करताना 84 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 106 धावा फटकावल्या. त्याचे हे वनडेतील 14 वे शतक आहे. याशिवाय टॉम बँटनने 58, डेव्हिड विलीने 51 धावा काढल्या तर टॉम करनने नाबाद 38 धावा जमविल्या. आयर्लंडच्या यंगने 53 धावांत 3 तर लिटल व कॅम्फर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. इंग्लंडच्या गोलंदाजांना मात्र आयर्लंडच्या फलंदाजांवर प्रभाव पाडता आला नाही.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 49.5 षटकांत सर्व बाद 328 : मॉर्गन 84 चेंडूत 106, बँटन 51 चेंडूत 58, विली 42 चेंडूत 51, यंग 3-53, लिटल 2-62, कॅम्फर 2-68. आयर्लंड 49.5 षटकांत 3 बाद 329 : स्टर्लिंग 128 चेंडूत 142, बलबिर्नी 112 चेंडूत 113, टेक्टर नाबाद 29, के. ओब्रायन नाबाद 21, विली 1-70, रशिद 1-61.









