शिमरॉन हेतमेयर-पंतच्या वादळी भागीदारीला शेवटच्या चेंडूवर अपयश
अहमदाबाद / वृत्तसंस्था
शिमरॉन हेतमेयर (25 चेंडूत नाबाद 53) व रिषभ पंत (48 चेंडूत नाबाद 58) यांच्या अवघ्या 44 चेंडूतील 78 धावांची अभेद्य भागीदारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वादळ उतरवण्यात यशस्वी ठरली असली तरी ती आरसीबीविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजय मात्र संपादन करुन देऊ शकली नाही. स्पीडस्टार सिराजच्या शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना रिषभ पंत केवळ चौकार फटकावू शकला आणि आरसीबीने एका धावेने नाटय़मय विजयावर शिक्कामोर्तब केले.
एबी डीव्हिलियर्सची 42 चेंडूतील 75 धावांचा झंझावात आणि मोहम्मद सिराजचे शेवटचे सॉलिड षटक यामुळे ही लढत विशेष गाजली. शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना पंतने लागोपाठ चेंडूवर लागोपाठ चौकार फटकावूनही दिल्लीचा संघ विजयापासून दूरच राहिला. आरसीबीचा हा हंगामातील पाचवा विजय असून ते गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान काबीज करण्यात यशस्वी ठरले. दिल्ली कॅपिटल्सचा संघ मात्र तिसऱया स्थानी कायम राहिले.
विजयासाठी 172 धावांचे आव्हान असताना दिल्लीची एकवेळ 3.3 षटकात 2 बाद 28 अशी दैना उडाली. शिखर धवन (6) व स्टीव्ह स्मिथ (4) येथे स्वस्तात बाद झाले. पण, पृथ्वी शॉ (21) व 9 धावांवर जीवदान मिळालेल्या रिषभ पंतने आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. या मोसमात आतापर्यंतचा पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेल दिल्ली कॅपिटल्ससाठी देखील खऱया अर्थाने कर्दनकाळ ठरला. त्याने 37 धावात 2 बळी घेतले.
डीव्हिलियर्सचा झंझावात
प्रारंभी, एबी डीव्हिलियर्सच्या झंझावातामुळे आरसीबीने या लढतीत 20 षटकात 5 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या गोलंदाजांनी सांघिक प्रदर्शन साकारत आरसीबीच्या फलंदाजांवर पहिल्या टप्प्यात लगाम घालण्यात यश मिळवले. अंतिम टप्प्यात मात्र एबी डीव्हिलियर्सच्या झंझावातामुळे त्यांचे प्रयत्न अधुरे ठरले. दिल्लीतर्फे इशांत शर्मा (1-26), अक्षर पटेल (1-33), कॅगिसो रबाडा (1-38), अमित मिश्रा (1-27), अवेश खान (1-24) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
3 चौकार व 5 षटकार फटकावणारा एबी डीव्हिलियर्स आरसीबीचा टॉप स्कोअरर ठरला. त्याने मार्कस स्टोईनिसच्या शेवटच्या षटकात (0-23) 3 षटकारांसह तब्बल 22 धावा फटकावल्या. रजत पाटीदार (31) व ग्लेन मॅक्सवेल (20 चेंडूत 25) यांनीही समयोचित योगदान दिले.
या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर देवदत्त पडिक्कल (17) व कर्णधार विराट कोहली (12) यांनी 3.5 षटकात 30 धावा फटकावत जोरदार सुरुवात केली. पण, नंतर डीसीच्या गोलंदाजांनी सरस मारा साकारल्याचे स्पष्ट झाले. मध्यमगती गोलंदाज अवेश खानने विराटला चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद करत पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला तर त्यापुढील चेंडूवरच इशांतने पडिक्कलचा बळी घेत सनसनाटी उडवून दिली.
यानंतर दोन नवे फलंदाज क्रीझवर असताना दिल्लीचे गोलंदाज खऱया अर्थाने प्रंटफूटवर आले. आरसीबीला पॉवर प्लेच्या 6 षटकात 36 धावात 2 गडी गमवावे लागले. मॅक्सवेलने ‘शॉर्ट कॅमिओ’ साकारत 2 षटकार व 1 चौकार फटकावले. पण, नंतर तो लेगस्पिनरच्या मिश्राच्या गोलंदाजीवर लाँगऑनवर तैनात आपलाच राष्ट्रीय सहकारी स्टीव्ह स्मिथकडे झेल देत तंबूत परतला. निम्मी षटके झाली असताना आरसीबीने 3 बाद 68 धावा केल्या होत्या.
रजत पाटीदारने 22 चेंडूत जलद 31 धावा फटकावल्या. निर्णायक टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने फटकेबाजी सुरु केल्यानंतर मात्र दिल्लीचे गोलंदाज अचानक हतबल, निराश भासू लागले. एबीडीने पाटीदारसमवेत 54 धावांची भागीदारी साकारली. अक्षर पटेलने पाटीदारला 15 व्या षटकात बाद केले. डीव्हिलियर्स वगळता आरसीबीच्या अन्य फलंदाजांना उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही.
आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत 5 हजार धावा
फलंदाज/ डाव / चेंडू
एबी डीव्हिलियर्स / 161 / 3288
डेव्हिड वॉर्नर / 135 / 3554
सुरेश रैना / 173 / 3620
रोहित शर्मा / 188 / 3817
विराट कोहली / 157 / 3827
शिखर धवन / 168 / 3956
पहिला सामना खेळणाऱया इशांत शर्माचे विकेट मेडन
एरवी टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाज जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याच्या इराद्यातच असतो. अशा वेळी अशा आक्रमक फलंदाजांना रोखणे निव्वळ आव्हानात्मक असते. पण, या हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या इशांत शर्माने मात्र डावातील 5 व्या षटकात एकही धाव न देता धोकादायक पडिक्कलचा बळी घेतला आणि टी-20 क्रिकेटमधील दुर्मीळ विकेट मेडन नोंदवली. इशांतने या षटकातील पहिल्या चेंडूवर पडिक्कलचा त्रिफळा उडवला होता.
धावफलक
आरसीबी ः विराट कोहली त्रि. गो. अवेश खान 12 (11 चेंडूत 2 चौकार), देवदत्त पडिक्कल त्रि. गो. शर्मा 17 (14 चेंडूत 3 चौकार), रजत पाटीदार झे. स्मिथ, गो. पटेल 31 (22 चेंडूत 2 षटकार), ग्लेन मॅक्सवेल झे. स्मिथ, गो. मिश्रा 25 (20 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), एबी डीव्हिलियर्स नाबाद 75 (42 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), वॉशिंग्टन सुंदर झे. व गो. रबाडा 6 (9 चेंडू), डॅनिएल सॅम्स नाबाद 3 (2 चेंडू). अवांतर 2. एकूण 20 षटकात 5 बाद 171.
गडी बाद होण्याचा क्रम
1-30 (विराट, 3.6), 2-30 (देवदत्त, 4.1), 3-60 (मॅक्सवेल, 8.3), 4-114 (रजत, 14.5), 5-139 (वॉशिंग्टन, 17.6).
गोलंदाजी
इशांत शर्मा 4-1-26-1, कॅगिसो रबाडा 4-0-38-1, अवेश खान 4-0-24-1, अमित मिश्रा 3-0-27-1, अक्षर पटेल 4-0-33-1, मार्कस स्टोईनिस 1-0-23-0.
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. डीव्हिलियर्स, गो. पटेल 21 (18 चेंडूत 3 चौकार), शिखर धवन झे. चहल, गो. जेमिसन 6 (7 चेंडूत 1 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. डीव्हिलियर्स, गो. सिराज 4 (5 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत नाबाद 58 (48 चेंडूत 6 चौकार), मार्कस स्टोईनिस झे. डीव्हिलियर्स, गो. पटेल 22 (17 चेंडूत 3 चौकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 53 (25 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार). अवांतर 6. एकूण 20 षटकात 4 बाद 170.
गडी बाद होण्याचा क्रम
1-23 (धवन, 2.3), 2-28 (स्टीव्ह स्मिथ, 3.3), 3-47 (शॉ, 7.2), 4-92 (स्टोईनिस, 12.4).
गोलंदाजी
डॅनिएल सॅम्स 2-0-15-0, मोहम्मद सिराज 4-0-44-1, काईल जेमिसन 4-0-32-1, वॉशिंग्टन सुंदर 4-0-28-0, हर्षल पटेल 4-0-37-2, यजुवेंद्र चहल 2-0-10-0.
बॉक्स
हवा होता षटकार, लागला चौकार!
तेजतर्रार जलद गोलंदाज सिराज गोलंदाजीला असताना डावातील शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सला षटकार ठोकण्याची गरज होती आणि यावेळी रिषभ पंतसारखा कसलेला फलंदाज स्ट्राईकवर होता…काईल जेमिसनला हेतमेयरने जे उत्तुंग षटकार खेचले, ते पाहता सिराजने चेंडू फलंदाजापासून काहीसा दूर राहील, याची काटेकोर काळजी घेतली आणि नेमका हाच गेमप्लॅन आरसीबीला स्वप्नवत विजय मिळवून गेला. फुलटॉस आऊटसाईड ऑफस्टम्पवरील चेंडू आपल्यापासून दूर आहे, याची जाणीव होताच पंतने त्यावर झेपावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, पूर्ण टप्प्यात चेंडू नसल्याने पंतच्या प्रयत्नावर मर्यादा राहणार, हे साहजिकच होते आणि नेमके तसेच झाले. हवा होता षटकार, पण, लागला चौकार अशी येथे पंतची गत झाली आणि दिल्लीच्या हातातोंडाशी आलेला विजय आरसीबीने अवघ्या एका धावेने हिसकावून घेतला!
बॉक्स
हेतमेयरची षटकारांची माळ, आरसीबीच्या गोटात खळबळ, पण….!
धावगती उंचावत असताना हेतमेयरने एकापेक्षा एक उत्तुंग षटकारांची माळ लावत आरसीबीच्या गोटात खळबळ उडवून दिली. एकवेळ तर काईल जेमिसनच्या एका षटकात 3 षटकारांसह 21 धावा वसूल करत त्याने विराटसेनेला क्षणभर हतबल करुन टाकले. पण, आरसीबीच्या सुदैवाने अगदी मोक्याच्या क्षणी हेतमेयर नॉन स्ट्रायकर एण्डवर राहिला आणि पंतला शेवटच्या चेंडूवर षटकाराऐवजी केवळ चौकारावरच समाधान मानावे लागल्यानंतर आरसीबीला बाजी मारता आली.









