शेवग्याच्या शेंगा हे एक काव्यमय आणि ह्रदयस्पर्शी प्रकरण आहे. अनेक दशकांपूर्वी य. गो. जोशी यांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ नावाची वाचकांना रडवणारी अप्रतिम कथा लिहिली होती. आम्ही आठवीत असताना आम्हाला ही कथा होती. त्यात वारसा हक्कासाठी भांडणाऱया भावंडांना धाकटी बहीण तारका एकत्र आणते आणि सर्वांसाठी स्वयंपाक रांधते. घराच्या दारात असलेल्या शेवग्याच्या शेंगांचं पिठलं करते. वर्गात ही कथा शिकवताना आमचे मराठीचे सर स्वतःच हळवे झालेले आठवतात. त्यांच्यामुळे वर्गातली अनेक मुलं रडायला लागली होती. त्या वयात साने गुरुजींची ‘श्यामची आई’ आणि दिवाकर कृष्ण यांची ‘अंगणातला पोपट’ या कथांनंतर आम्हाला रडवणारी ही एकच कथा. एरव्ही आम्हाला रडवायला मारकुटे वायडी मास्तर पुरेसे होते.
मोठेपणी शेवग्याच्या शेंगा भेटल्या आणि नेहमी भेटतात-त्या उडप्याकडे गेल्यावर इडली सांबारात किंवा वडा सांबारात. इडली सांबार किंवा वडा सांबार हे हाताने खायचे पदार्थ नाहीत, ते काटा-चमच्याने देखील खायचे पदार्थ नाहीत. त्यांच्या बरोबर उडपी दोन चमचे देतो. अशावेळी त्या चमच्यांनी ती शेंग उलगडून कशी खायची हे मला अद्याप कळलेले नाही. अशा वेळी मी संकोच सोडतो आणि मुख्य डिश खाऊन झाल्यावर हाताने शेंग सोलून खातो. हात धुवून मग कॉफी मागवतो.
टीव्हीवर एका कौटुंबिक कार्यक्रमात भावजी अनेक भावजयींच्या मुलाखती घेतात. त्यांना बोलते करतात. निरुपद्रवी खेळ खेळायला सांगतात आणि नंतर पैठणी वगैरे बक्षीस देतात. त्यांनी पैठणीसाठी हा खेळ ठेवायला हरकत नाही म्हणजे स्पर्धक वहिनींना भरपूर शेंगा घातलेलं सांबार द्यायचं नि चमच्यांचा वापर करून सर्वाधिक शेंगा खाणारीला पैठणी द्यायची.
आचार्य अत्र्यांच्या ‘मोरुची मावशी’ नाटकातदेखील एका विनोदी गाण्यात शेवग्याच्या शेंगा भेटतात. गाण्याची ओळ आहे.
टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा,
आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा
सध्या कोरोनामुळे टीव्हीवर रोज कोणीतरी आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा करताना दिसतो. त्यामुळे पुढील ओळी जोडाव्याशा वाटतात.
टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा
आयुर्वेदाच्या नावाखाली भोंदू करतात देशभर दंगा
कोरोनाच्या औषधाला खरे की खोटे बघायला
क्लिनिकल ट्रायलचा लावा रे भुंगा








