मागण्या मान्य न झाल्यास आजपासून आंदोलन तीव्र करणार

प्रतिनिधी /वाळपई
तीन मागण्यांसाठी शेळ-मेळावली भागातील ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन दुसऱया दिवशी सुरू होते. मंगळवारी रात्रीपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. याबाबत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
गोवा सरकारच्यावतीने गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ-मेळावली या ठिकाणी आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन उभे राहिले होते. सदर आंदोलन चिरडून टाकण्याच्या उद्देशाने सरकारने 40 आंदोलनकर्त्यावर फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल केले. सदर खटले मागे घ्यावेत व आयआयटी प्रकल्पाला दिलेली जागा सरकारी परत आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काल मंगळवारी पुन्हा एकदा या आंदोलनाला सुरुवात झाली. सकाळपासून मोठय़ाप्रमाणात ग्रामस्थांनी पंचायतीच्या इमारतीसमोर बसून आंदोलन करण्यात आले. सत्तरी तालुका गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन या संदर्भात स्पष्टपणे माहिती द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र एकही अधिकारी सदर ठिकाणी पोहोचला नाही. यामुळे बुधवारपासून सदर आंदोलन आक्रमण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे. यासंदर्भात कृती अजून पर्यंत जाहीर करण्यात आली नाही .मात्र बुधवारी सकाळी या संदर्भात आंदोलनाची कृती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
पंचायत कार्यालयामध्ये येण्यास पंचसभासदांना रोखणार
दरम्यान, याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर पंचायतीच्या पंच सभासदांना पंचायत कार्यालयामध्ये येण्यास रोखले जाणार आहे. एकाही पंच सभासदाला पंचायतीमध्ये येण्यास दिले जाणार नसून तसा प्रयत्न केल्यास त्यांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे सध्यातरी पंचायत मंडळाच्या पंच सभासदांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गेल्या दोन दिवसांपासून एकही पंचायत सभासद पंचायत कार्यालयामध्ये आला नसल्याची माहिती हाती आली आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सध्यातरी पंच सभासदावर मोठय़ा प्रमाणात मानसिक तणाव निर्माण झाला असून काही पंच सभासदांनी या पासून आपली सुटका घेण्याच्यादृष्टीने पंच सभासदत्वाचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. तर सरपंच या अपूर्वा च्यारी यांनी सरपंचपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात विचार सुरू केल्याची माहिती हाती आली आहे.
गेले दोन दिवस पंचायत कार्यालयात पाय ठेवलेला नाही : सरपंच
दरम्यान, याबाबत अपूर्वा चारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्यातरी आपण सरपंचपदाचा राजीनामा दिलेला नाही. गेले दोन दिवस पंचायत कार्यालयात पाय ठेवलेला नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.









