वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळे मेळावली या ठिकाणी होऊ घातलेल्या नियोजित आयआयटी प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहेच. त्याचप्रमाणे या प्रकल्पासंदर्भात गुळेली पंचायतीने खास ग्रामसभा बोलावून हा विषय चर्चेला घ्यावा .आयआयटी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने यासंदर्भाची माहिती स्थानिकांना उपलब्ध करून द्यावी .त्याचप्रमाणे या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध असल्याचे लेखी पत्र स्थानिक पंचायतीने आयआयटी व्यवस्थापनाला सुपूर्द करावे अशा प्रकारच्या मागण्या करीत आज आयआयटी विरोधकांनी गुळेली पंचायतीवर मोर्चा नेला .

यावेळी सरपंच अपूर्वा चारी व इतर पंच सभासद व सचिवांना घेरण्याचा प्रयत्न केला .प्रकल्पाला विरोध असल्याचे पत्र लवकरात लवकर न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.
याबाबतची माहिती अशी की शेळ मेळावली याठिकाणी सरकारतर्फे आयआयटी प्रकल्प नियोजित करण्यात आलेला आहे. या संदर्भात दहा लाख चौरस मीटर जमीन आयआयटी व्यवस्थापनाला गोवा सरकारला सुपूर्द केलेली आहे. मात्र या भागातील नागरिकांच्या काजू बागायती व इतर स्वरूपाच्या बागायती असून जैवविविधता नष्ट होणार असल्याचे कारण पुढे करून या प्रकल्पाला पंचायत क्षेत्रातील अनेक गावांमधून विरोध होताना दिसत आहे.
यासंदर्भात सभा यापूर्वी घेण्यात आलेले आहे. दुसऱया बाजूने आयआयटी समर्थनार्थ स्थापन करण्यात आलेल्या आयआयटी बचाव समितीच्या माध्यमातून या प्रकल्पाला समर्थन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे आयआयटी बचाव व विरोध अशा परस्पर भूमिकांच्या माध्यमातून या भागांमध्ये सध्या वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान या प्रकल्पाला विरोध असल्याचे कारण पुढे करून सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेचे निवेदन पंचायतीच्या सरपंच अपूर्वा चारी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी जवळपास 100 पेक्षा जास्त आयटीआय विरोधक पंचायतीच्या कार्यालयासमोर जमले होते .
यावेळी त्यांनी अपूर्वा चारी यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रकल्पाला आजही आपला कठोर विरोध असल्याचे सूचित केले.
प्रकल्प होऊ देणारच नाही
यावेळी अपूर्वा चारी व पंचायतीच्या सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिती होऊ देणार नसल्याचा पुनरुच्चार आयआयटी विरोधकांनी केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील नैसर्गिक व जैविक संपत्ती पूर्णपणे धोक्मयात येणार असून याला जबाबदार कोण अशाप्रकारचा सवाल या भागातील नागरिकांनी यावेळी केला .त्याचप्रमाणे हा प्रकल्प या भागात आणण्यापूर्वी या नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र त्या संदर्भात हालचाल न झाल्यामुळे व एकूण या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील पर्यावरणाचे भवितव्य अंधारात होणार असल्याने या प्रकल्पाला विरोध असणार असल्याचे निवेदन सादर करण्यासाठी आलेल्या आयआयटी विरोधकांनी स्पष्ट केले.
खास ग्रामसभा बोलवा.
दरम्यान या प्रकल्पासंदर्भात सविस्तरपणे चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पंचायतीने खास ग्रामसभा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात लेखी निवेदन यावेळी पंचायतीला सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे हा प्रकल्प या भागात येण्यापूर्वी पंचायतीने कोणत्या प्रकारचे कागदपत्रे सोपस्कार केले आहे. त्यासंदर्भात सविस्तरपणे माहिती देण्याचा आग्रह या विरोधकांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना सरपंच अपूर्वा चारी व सचिव मुला वरक यांनी सांगितले की या संदर्भाचा कागदपत्रे सोपस्कार अजूनही पंचायतीने केलेला नाही. फक्त या प्रकल्पाचे स्वागत करण्याचा ठराव यापूर्वीच्या पंचायत मंडळाच्या बैठकीमध्ये संमत करण्यात आलेला आहे.
प्रकल्पाला विरोध असल्याचे लेखी पत्र द्या.
दरम्यान यावेळी सदर प्रकल्पाला पंचायतीचा विरोध असल्याचे लेखी पत्र देण्याची मागणी आक्रमक पद्धतीने विरोधकांनी सरपंच व इतर पंचायत सभासद यांच्यासमोर केली .मात्र अशा प्रकारचे पत्र आपण देऊ शकत नसल्याचे निवेदनात अपूर्वा चारी यांनी केली. यावेळी आक्रमक बनलेल्या नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत सदर पत्र न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशाप्रकारचा इशारा दिला .यासंदर्भात आपण आत्ताच ते पत्र देऊ शकत नसून पंचायत मंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचे उत्तर सरपंच अपूर्वा चारी यांनी उपस्थितांना दिले. 3 सप्टेंबर पर्यंत सदर स्वरूपाचे पत्र आपण देणार असल्याचे यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. मात्र उपस्थितांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी 3 सप्टेंबर रोजी या संदर्भाचे पत्र देणार असल्याचे लेखी आश्वासन आता द्या अशा प्रकारचा तगादा लावल्यानंतर त्या संदर्भाचे लेखी आश्वासन पंचायतीचे सचिव मुला वरक यांनी दिल्याचे आयटीआय विरोधकांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती.
दरम्यान यापंचायतीवर जवळपास 100 पेक्षा जास्त आयआयटी विरोधकांनी गर्दी करून यासंदर्भात निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयाबाहेर मोठय़ा प्रमाणात उपस्थित असलेल्या विरोधकांनी मोठय़ा प्रमाणात आक्रमक स्वरूपाचे भूमिका घेतल्यामुळे काही प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. एका शिष्टमंडळाने सरपंच व इतरांची भेट घेण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर बाहेर उपस्थित असलेल्या विरोधकांनी बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा सविस्तरपणे अहवाल देण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली. त्यावेळी सरपंच व सचिवांनी उपस्थितांसमोर येऊन एकूण चर्चेदरम्यान झालेल्या संदर्भाचे सविस्तरपणे माहिती दिली.









