साल्वादोर द मुन्दू येथील शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी / पर्वरी
साल्वादोर द मुन्दू पंचायतक्षेत्रातील सापॉवल टेनन्टस् असोसिएशनच्या दुर्लक्षामुळे खाजन मानशीत गेले सलग 4 महिने खारे पाणी भरून ठेवल्याने शेतकऱयांना शेतीची कामे करता येत नाही. त्यामुळे असोसिएशनने शेतकऱयांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडित शेतकऱयांनी केली आहे.
डिसेंबर 2019 मध्ये या मानशीची एका वर्षासाठी 25 लाख बोली लावून पावणी करण्यात आली होती. मंगेश वाळके या शेतकऱयाने ती बोली लावली होती. एवढे पैसे एका वर्षात कमावणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया या भागातील मासेमारी व्यवसायातील लोकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे मानशीच्या पावणीदारांपुढे पाणी भरून ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
मे महिना सुरू झाला तरी शेतात पाणी भरून राहिल्यामुळे शेतात काम करणे अश्यक्य होत असल्याने शेतकरी पॉली आंतांव व इतरांनी बार्देश उपजिल्हाधिकारी, मामलेदार, कृषी खाते, स्थानिक आमदार रोहन खंवटे, सरपंच संदीप साळगावकर व अन्य संबंधितांना लेखी तक्रार केली होती.
त्यानुसार सोमवार 11 मे रोजी सदर मानशीची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार, सरपंच व पावणीदार यांच्यात शाब्दिक वाद झाला. मामलेदार कार्यालयाने पावणीदार वाळके यांच्या गैरवर्तनाची व बेजबाबदारपणाची दखल घेऊन त्यांची पावणी रद्द करून शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यास सांगावे, तसेच असोसिएशनकडे जमा झालेल्या पावणीच्या रकमेतून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच साळगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या प्रारंभी सर्व व्यवहार बंद असतानाही मानशीवर मासे खवय्ये मोठय़ा संख्येने एकत्र येत होते. यासंबंधी पर्वरी पोलिसात तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नव्हती, त्याबद्दल सरपंचांनी साशंकता व्यक्त केली आहे.









