शेती पंपाची सबसिडी आणि विजपुरवठा खंडीत करु नये म्हणून आंदोलन
कुंडल : वार्ताहर
तत्कालीन शासनाबरोबर संघर्ष करुन मिळविलेली शेती पंपाची सबसिडी बंद न करता पुढे चालु ठेवावी तसेच थकबाकीसाठी अडवणूक करुन विजपुरवठा खंडीत करु नये या व अन्य मागणीसाठी कृषीपंपधारक शेतकरी लिफ्ट इरिगेशन पदाधिकारी व सभासद तसेच शेतकरी यांचा विराट मोर्चा महावितरणच्या कोल्हापुर कार्यालयावर सोमवार दि. २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वा आयोजित केला असून या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार अरुण अण्णा लाड यांनी केले आहे.
कै. डॉ. क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड, कै. डॉ. क्रांतिविर नागनाथ अण्णा नायकवडी व प्रा. एन.डी.पाटील यांनी १९९५ पासून तत्कालीन शासनाबरोबर संघर्ष करुन मिळविलेली शेती पंपाची सवलत(सबसिडी) या शासनाने बंद केली आहे. २०२१च्या महापूराने सहकारी पाणीपुरवठा संस्था व शेतकरी यांचे ट्रान्सफॉर्मर, विद्युत मोटारी व इले, साहित्याचे मोठे नुकसान झाले ते शेतकरी व संस्थांनी स्वखर्चाने दुरुस्त केले. पुन्हा २०२१ च्या महापुरात नुकसान झाले. त्यातच महावितरणने शेती व सहकारी पाणीपुरवठा संस्था यांना जून २०२१ पासून वाढीव दराने विजबिले पाठवली असून चालु असलेल्या कृषी च्या लघुदाब व उच्चदाब ग्राहकांना मिळणारी शासनाची क्रॉस सबसिडी रक्कम पुर्ण कमी केल्याने निर्धारीत वाढीव दराने बिले येत आहेत.
त्याचबरोबर वेगवेगळे वाढीव चार्जेस लावुन आधीच वाढलेल्या दरामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी आणखीनच भरडला जात असून एकीकडे दरवाढ करुन तर दुसरीकडे शेतीचा विजपुरवठा दोन तासाने कमी केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याने पिके वाळु लागली आहेत. त्यामुळे शेतीला कायम दिवसा १२ तास विजपुरवठा होणे ही आवश्यक आहे. या व आशा अन्य मागण्यासाठी सोमवार दी. २० रोजी सर्व शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.अरुण लाड यांनी केले आहे.









