प्रतिनिधी / कराड :
महावितरण कंपनीच्या कृषिधोरण 2020 या योजनेंतर्गत थकीत असलेल्या शेती बिलांची वसुली सुरू आहे. 31 मार्चपर्यंत या योजनेंतर्गत सुधारित थकबाकीवर 50 टक्के सवलत मिळणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 31 मार्च 2022 ही ग्राहकांना बिलात 50 टक्के सवलत मिळण्याची अंतिम तारीख आहे. या योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांनी घेतला असून अजूनही लाभ न घेतलेल्या शेतकरी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कृषिधोरण 2020 या योजनेअंतर्गत शेतीपंपाची थकलेली वीजबिले वसूल करण्याकरिता शेतकऱ्यांना भली मोठी सवलत देऊन ही योजना राबविण्यात येत आहे. 31 मार्च 2022 अखेर जर शेतकरी थकीत बिल भरत असेल तर सुधारित थकबाकीच्या 50 टक्के बिल माफी देण्यात येत आहे. शेतीपंप थकबाकी ही मागील 7 ते 8 वर्षामधील आहे. मागील चार दिवसात उर्जाखात्याकडून शेतीचे कनेक्शन तीन महिने न तोडण्याचे आदेश मिळाले आहेत. हे आदेश येताच महावितरणमध्ये ऐन मार्चमध्ये वसुलीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यात कृषीधोरण 20 अंतर्गत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी महावितरणचे सर्व कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी प्रयत्न करत होते, पण सध्याच्या कनेक्शन न तोडण्याच्या आदेशाने शेतकरी बिल भरायला धजावणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनाच 50 टक्के वीजबिल माफीला मुकावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांची बिलाबाबत तक्रार असेल तर त्याचे निराकरण करण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. त्याचा फायदा घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांनी बिलाबाबत तक्रार असेल तर महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 31 मार्चपूर्वी वीजबिल भरून 50 टक्के माफीचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावे, असे आवाहन वडूजचे उपकार्यकारी अभियंता दीपक घारे यांनी केले आहे.
मी थकबाकीमुक्त झालो
मी दुष्काळी भागातील शेतकरी आहे. मी महावितरणच्या कृषिधोरण योजनेचा सहभाग घेतला आहे. थकबाकी मुक्त झालो आहे.मला या योजनेतून 65,600 रुपये एवढी बिल माफी मिळाली आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– महादेव धोंडिबा चौधरी ,मु. पो.हिंगणी, ता.माण









