कोरोना : वैरागचे शेतकरी बजरंग पांढरमिसे यांची व्यथा
वैराग / प्रतिनिधी :
उन्हाळ्यात हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून शेतकरी खरबूज पिकाला पसंती देतात. वैरागचे बजरंग पांढरमिसे यांनी खरबूज लावण्यापूर्वी बोआर घेवून पहिल्यांदा पाण्याची सोय केली. त्यानंतर कोहिनूर एक्स्पर्ट जातीची एक एकर क्षेत्रावरती खरबूजची लागण केली. त्यासाठी शेतीची मशागत करून बेड तयार केले. त्यावरती ड्रीप अंथरुन मलचींग पेपर टाकला. त्यामध्ये बियाणे लावून वेळोवेळी खते, फवारण्या केल्या. पिक जोमदार आल्याने उसनवार करून खर्च भागवला. सुमारे सव्वा लाख रुपयेच्या घरात खर्च पोहचला. यातून किमान पाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे बाजारपेठाच बंद झाल्या. सुरुवातीला लॉक डाऊन कमी होईल वाटत होते. पण वाढतच गेले परीणामी शेतातील माल शेतातच वाढू लागला. सुरुवातीला लोकांना तसाच वाटला. पण आता कोणीच घेऊन जाईनात म्हणून आहे असा प्लॉट सोडून देण्याची वेळ आली. हातातोंडाशी आलेले पिक कोरोनामुळे नष्ट झाले त्यामुळे बजरंग पांढसमिसे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पारंपारिक पिके घेताना वेळ जास्त लागतो तर उत्पन्न म्हणावे असे येत नाही म्हणून शेतकरी बांधव आता नगदी पिके व फळ बागे कडे वळले आहेत. या पिकात कमी कालावधीत जास्त कष्ट करून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. पारंपारिक पिकांना जोड व खर्च भागविण्यासाठी फळ शेती हा पर्याय बऱ्याच शेतकऱ्यांनी निवडला आहे .पण कधी पाण्याची कमतरा तर कधी दुष्काळाचे आसमानी संकट शेतकऱ्यावर घोंगावत असते. याला लॉकडाऊनचा फटका बजरंग पांढरमिसे यांना बसला असून आता शहरातील विविध फाऊंडेशन, सामाजिक संस्थांनी शेतकऱ्यांचा माल घेवून तो शहरातील बाजारपेठेत विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .









