प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्व घटकांना विश्वासत घेवून इचलकरंजी पाणी योजना पूर्ण होईल. सध्या दूधगंगा काठावर पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी दौरा करणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले. इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेचा त्यांनी मंगळवारी शासकिय विश्रामगृह येथे आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
ते म्हणाले, कागल, शिरोळच्या शेती सिंचनासाठी असलेल्या आरक्षित पाण्याला धक्का न लावता पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी इचलकरंजी शहरासाठी देण्यात येणार आहे. प्रस्तावित योजनेत 2049 ची लोकसंख्या विचारात घेवून 1 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. सध्या शहराची 54 ते 66 लाख लिटर इतकीच गरज आहे. सध्या गैबी बोगद्यातून पंचगंगा नदी पात्रात इचलकरंजी शहरासाठी 33 लाख लिटर पाणी सोडण्यात येते. याचा विचार केल्यास सध्या दूधगंगातून केवळ पिण्यासाठी राखीव असलेल्या कोटय़ातून 30 ते 35 लाख लिटर पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी भिती बळगण्याचे कारण नाही. असे आवाहन माने यांनी केले.
पंचगंगा शुद्धीकरणाला प्राधान्यदूधगंगातून पाणी आणत असताना पंचगंगा शुद्धीकरणाचे प्रयत्न कमी होणार नाही. तोही प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येणार आहे. सध्या इचलकरंजीतील प्रदुषण करणाऱया प्रकल्पांवर धडक कारवाई केली. इचलकरंजी शहरातून झीरो डीसचार्ज ध्येय ठेवून प्रदुषणाबाबत काम सुरु असल्याचे माने यांनी एका प्रश्नावर सांगितले. शिरोळमधील शेतकऱयांचाही गैरसमज दूर करुन विना वादंग इचलकरंजी सुळकुड योजना सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सुळकुडच्या पुढे नविन बंधार बांधून पाणी उचलण्यात येणार आहे.
समरजीत घाटगेंचा गैरसमज दूर करु- नगराध्यक्षा ऍड. अलका स्वामी
इचलकरंजी शहराला सुळकुड येथून पाणी देण्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी विरोध केला आहे. इचलकरंजी पालिकेत भाजपची सत्ता आहे. यापार्श्वभूमीवर बैठकीनंतर विचारले असता त्यांचा गैरसमज दूर करु असे नगराध्यक्षा ऍड अलका स्वामी यांनी सांगितले. धरणातील पाणीसाठी आणि शेती, उद्योग, आणि पिण्यासाठी असलेला शिल्लक साठा याची दिशाभूल करणारी महिती सांगितली जात आहे. मात्र प्रशासनाने दिलेली अधिकृत माहिती घेवून त्यांची भेट घेणार असल्याचेही स्वामी यांनी सांगितले.








