सुवर्णविधानसौध परिसरात पोलिसांकडून अडवणूक : शेतकऱयांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे सुगी हंगाम वेळेत संपविण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी सुवर्ण विधानसौध परिसरातून शेताकडे जाणाऱया शेतकऱयांची अडवणूक करून पोलिसांनी चौकशी केली. त्यामुळे शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी हलगा, कोंडसकोप गावच्या शिवारात भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या ठिकाणाहून शेताकडे जाणाऱया बळीराजाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. मंडप शिवारातच उभारण्यात आल्याने शेतकऱयांना ये-जा करणे कठीण जात आहे. दरम्यान प्रवेशद्वारावर तैनात असलेले पोलीस शेतकऱयांची अडवणूक करून पासचीदेखील मागणी करीत आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसामुळे लांबणीवर पडलेल्या सुगी हंगामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱयांची धडपड सुरू झाली आहे. सकाळपासूनच शिवारात वर्दळ दिसून येत आहे. मात्र हलगा, कोंडसकोप शिवारात अधिवेशनाचे मंडप, पोलीस-आंदोलनकर्त्यांच्या गर्दीमुळे शेतकऱयांना ये-जा करणे त्रासदायक बनले आहे.









