प्रतिनिधी/सांगली
आम्ही सगळेच शरद जोशी यांच्या शाळेतले विद्यार्थी असलो तरी राजू शेट्टी हे नापास झालेले विद्यार्थी आहेत. त्यांनी परत अभ्यास करावा. शेती सुधारणा कायद्याला विरोध करून शेट्टी शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या लोकांचे नेतृत्व करत आहेत अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी सुधारणा विधेयकाच्या समर्थनासाठी खोत यांनी ही परिषद आयोजित केली होती. काँग्रेस आणि डावे पक्ष आणि शेट्टी २५ रोजी कायद्याला विरोध करणार असतील तर रयत क्रांती संघटना त्याला विरोध म्हणून राज्यभर स्वागत अभियान राबविणार आहे. २५ रोजीच राज्यातील शेतकरी स्वातंत्र्याची गुढी उभी करून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करतील अशी घोषणाही खोत यांनी केली.
ते म्हणाले, बाजार समित्यांची एकाधिकारशाही संपुष्टात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या पायात नेहरू काँग्रेसने 70 वर्षापूर्वी घातलेल्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आहेत. मंत्री तोमर यांनी संसदेत शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांचा आदराने उल्लेख केला आणि त्यांचे विचार समोर ठेवले. हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्य चळवळीला आलेले यश आहे. असे असताना त्यांच्याच शाळेत शिकलेले राजू शेट्टी या विधेयकास विरोध करत आहेत ही चळवळीची शोकांतिका आहे. शेट्टी यांची नाळ व्यापारी, दलाल, भांडवलदार यांच्याशी जोडलेली आहे. त्यामुळे ते शेतकरी स्वातंत्र्याच्या आड येत आहेत. कांदा निर्यात धोरण विरोधात आम्ही केंद्र सरकार विरोधात नुकतेच आंदोलन केले आणि सीमेवर आणि जहाजात अडकलेला कांदा निर्यातीची परवानगी मिळवली. तत्वाशी तडजोड केली नाही.
नव्या शेतकरी सुधारणा विधेयक मुळे आता बाजार पेठेला शेतकऱ्या च्या बांधावर जाऊन दर द्यावा लागेल. शेतकरी स्वतःच्या कंपन्या स्थापन करू शकेल. मोठ्या कंपन्या शेतीत गुंतवणूक करून मालाची साठवणूक करू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळेल. त्यामुळे रयत क्रांती संघटना राज्यातील प्रत्येक शेतात शेतकऱ्यांना गुढी उभारून या निर्णयाचे स्वागत करण्याचे आवाहन करत आहे असेही खोत यांनी सांगितले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








