उचगांव / वार्ताहर
शेतकऱ्यांना भीक नको त्यांच्या हक्काची व शासनाने जाहीर केलेली मदत त्वरीत द्या अशी मागणी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.
चिंचवाड ( ता.करवीर ) येथे शिवार संवाद कार्यक्रमाच्या जिल्हा दौऱ्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी करवीर तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा थेट बांधावर जाऊन समजावून घेतल्या. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही ही दिली.
ते पुढे म्हणाले, जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी चोहोबाजूंनी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने कर्जमाफी योजनेतील प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान , शेतकऱ्यांनी त्यांची कर्जे दुसऱ्यांदा प्रामाणिकपणे भरून सात महिने उलटले तरी देण्याचा पत्ता नाही. दोन लाखांच्या आतील थकबाकीदार कर्जदार काही शेतकरीही कर्जमाफीपासून वंचित आहेत. तसेच दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत शासन कोणताही शब्द काढण्यास तयार नाही. अतिवृष्टीने गतवर्षीच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी आहे.
हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी. शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावीत. या विज बिल माफीसह केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी. दूध दरवाढीच्या आंदोलनाची दखाल घ्यावी. प्रोत्साहनात्मक अनुदान, दुध अनुदान, वीजबिल माफी’ या सर्व बाबी शासनाने शेतकऱ्यांना देण्याच्या केवळ घोषणा केल्या आहेत. शासनाने दिलेला शब्द पाळावा अन्यथा शेतकऱ्यांच्या फार मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही घाटगे यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न शासन गांभीर्याने घेताना दिसत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. शेतकऱ्यांनी जागं व्हावं यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मदत देण्यास भाग पाडू. शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याशिवाय आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांसोबत राहू.
यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवानराव काटे, तुकाराम बोडके, रंगराव तोरकस्कर,संघर्ष कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. स्वागत भूपाल पाटील यांनी केले. आभार यांनी मानले.









