सांगली / प्रतिनिधी
शेती संबंधित राज्यसभेत मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे. सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
मोदी सरकारकडून देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकर्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत. अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे, हे दिसते. कार्पोरेट कंपन्या शेतकर्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकर्यांना यामधून काहीच मिळणार नाही. असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
Previous Articleसांगलीत मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या दारात हलगी बजाव
Next Article आरक्षण स्थागितीवरून मराठा समाज रस्त्यावर








