ऑनलाईन टीम / चंदीगड :
नव्या कृषी कायद्याविरोधात मागील दोन आठवड्यांपासून सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरत आहे. या आंदोलनामुळे अनेक दिग्गज देखील दुःखी आहेत. त्यातच बॉलीवुड अभिनेते धर्मेंद्र यांनी शुक्रवारी ट्विट करत म्हटले की, मी माझ्या शेतकरी बांधवांचे होणारे हाल पाहून दुःखी झालो आहे. सरकारला या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे.

दरम्यान, याआधी देखील अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केले होते त्यावेळी धर्मेंद्र यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, माझी सरकारला विनंती आहे की, शेतकरी बांधवांच्या समस्यांवर लवकरात लवकर उपाय करावा. कोरोनाच्या केसेस दिल्लीत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे. मात्र, हे ट्विट धर्मेंद्र यांनी काही वेळातच डिलीट केले होते.
दरम्यान, धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल हे पंजाबच्या गुरुदासपूरमधील भाजपचे खासदार आहेत. 84 वर्षीय धर्मेंद्र आपल्या फार्महाऊस मध्ये एकटेच रहातात. लोणावळा मधील या फार्महाऊसमध्ये ते शेती देखील करतात. त्याच्याकडे अनेक गाई देखील आहेत. आपल्या फार्महाऊसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात.









