सलगरे / प्रतिनिधी
वजनातील काटामारी, कारखान्याच्या परिसरात राखेमुळे होत असलेले शेती पिकांचे नुकसान, आणि ऊस तोडणीच्या टोळ्याकडून चालू असलेली आर्थिक लूट या विरोधात केंपवाडच्या अथणी शुगर फॅक्टरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक मोर्चा काढला. हा मोर्चा कर्नाटक पोलिसांनी आर.टी.पी.सी.आर चाचणीची मागणी करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच अडवला.
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा कारखान्यापासून दीड किलोमीटर अंतरावर अडविण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. खटावचे माजी उपसरपंच रावसाहेब बेडगे अशोक हणमापुरे तसेच लिंगनूर, जानराववाडी आदी आसपासच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होते. मोर्चा जरी सीमेवर अडविण्यात असला तरी, कारखान्याच्या प्रशासनाने सीमेवर येवून आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.