पुंडलिक खोत यांची माहिती : मलिकवाड किसान पीकेपीएसची वार्षिक सभा
वार्ताहर / मलिकवाड
संस्थेमार्फत शेतकऱयांना देण्यात येणाऱया कर्जाची पत वाढविण्यात आली आहे. याचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर 6 एकरांवर शेती असणाऱया शेतकऱयांना ट्रक्टर योजना कार्यान्वित करण्यात आली आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक खोत यांनी सांगितले. येथे किसान पीकेपीएसच्या सभागृहात आयोजित संस्थेच्या 24 व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी अहवाल वाचन करताना मुख्य कार्यनिर्वाहक संभाजी माने म्हणाले, संस्थेला अहवाल सालात 9 लाख 16 हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेत 4 कोटी 29 लाख ठेवी, 5 कोटी 20 लाख कर्ज, गुंतवणूक 70 लाख 35 हजार याचबरोबर कोरोना काळात सेवा बजाविलेल्या आशा कार्यकर्त्यांच्या सत्कारासह मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी 11 हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच 2019 मध्ये आलेल्या महापुरावेळी पुरग्रस्तांना मदतही करण्यात आली असून आता नेफ्टसह आरटीजीएस सुविधाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालक कुमार बाकळे, निवास करजगे, प्रकाश कोळी, बाबासो कोळी, सावकार कुडचे, विश्वनाथ पाटील, आनंद पाटील, उमेश मठपती, चंद्रकांत शिंदे, विजय खोत, निंगाप्पा गजबर, दिलीप कांबळे, संजय कुन्नूरे, कुमार जाधव, प्रमोद टाकमारे यांच्यासह नागरिक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. ग्रा. पं सदस्य अविनाश खोत यांनी आभार मानले.









