भरतेश बनवणे यांचे आवाहन : अंकली येथे ऊस विकास चर्चासत्र कार्यक्रम
वार्ताहर / मांजरी
शेतकऱयांनी कृषी उत्पादन वाढविण्यासाठी जागरूक असले पाहिजे. कारखान्याकडून यासाठी प्रयत्न केले जात असून शेतकरी इच्छुक असल्यास यापुढेही नियमित मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे मनोगत चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवणे यांनी व्यक्त केले.
अंकली येथील शिवालय अनुभव मंडपमध्ये इंडियन पोटॅश लिमीटेड आणि चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ऊस विकास चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. बनवणे म्हणाले, शेतकऱयांनी वारेमाप खताचा वापर टाळावा. उत्पादन घेताना तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असून शेतकऱयांनी शेतीची ताळेबंदी तयार करून उत्पादन व खर्च यांचा ताळमेळ घालून शेती करावी. शेतकऱयांचे भांडवल असलेली शेतजमीन दिवसेंदिवस नापीक होत असून उत्पादनाबरोबर उत्पन्न घटत चालले आहे. यासाठी शेतकऱयांनी शेतजमिनीच्या सुधारणेस प्राधान्य द्यावे व पुढील पिढीस शेतजमीन अनुकूल करून द्यावी. कारखान्याकडून विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमात इंडियन पोटॅश लिमिटेडचे संचालक सुरेंद्र बन्सल म्हणाले, शेतकऱयांच्या हिताचा विचार करून गेली कित्येक वर्षे इंडियन पोटॅश लिमिटेड ही उत्पादन कंपनी काम करत आहे. कंपनीच्यावतीने शेतकऱयांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले जाते. भारतात आवश्यक असणाऱया पोटॅशचे कंपनीकडून 60 टक्के ऊत्पादन केले जाते. 45 टक्के पोटॅशची दक्षिण भारतात विक्री केली जाते. दक्षिण भारतातील जमिनीची आवश्यकता लक्षात घेऊन पोटॅशला मागणी आहे. शेतकऱयांनी पोटॅशचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. पोटॅश मुळांना सक्षम बनवण्याचे कार्य करते. लहान लहान मुळांना पोटॅशची गरज असते. वनस्पतीची जडणघडण या मुळांच्या अन्न शोषणानुसार दिसून येते. शेतकऱयांनी जमिनीच्या आवश्यकतेनुसार खत नियोजन करून उत्पादन घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, संचालक अजितराव देसाई, मल्लाप्पा म्हैशाळे, रामचंद्र निशाणदार, चेतन पाटील, आयपीएल कंपनीचे राज्य मार्केटिंग प्रमुख शरद बाबू एस., एसएमओ मुकुर्थीहाळ, आर. टी. पाटील, साहाय्यक कृषी संचालक जनमट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.









