लखिमपूर खेरी / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वधेरा यांचा शेतकऱयांच्या भेटीसाठी बुधवारी दिवसभर संघर्ष सुरू होता. सरकारने दिलेल्या परवानगीनंतर राहुल आणि प्रियांका गांधी हे दोघेही अखेर निवडक कार्यकर्त्यांसमवेत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लखिमपूर खेरीच्या टिकुनिया गावात पोहोचले. तत्पूर्वी, लखनौ सोडल्यानंतर राहुल सीतापूर गेस्ट हाऊसवर पोहोचल्यानंतर थेट प्रियांका गांधींना भेटले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर भाऊ-बहीण शेतकऱयांना भेटण्यासाठी लखिमपूरला रवाना झाले होते. दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा नेते सतिशचंद्र मिश्र गुरुवारी लखिमपूर खेरीला भेट देणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेस नेते सचिन पायलट आणि प्रमोद कृष्णम यांना मुरादाबाद येथील सर्किट हाऊसमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही नेते रस्त्याने लखिमपूर गाठण्याचा प्रयत्न करत होते. ते सकाळीच गाझिपूर सीमेवरून दिल्लीमार्गे उत्तर प्रदेशात दाखल झाले होते.
लखिमपूर खेरीमध्ये शेतकऱयांना वाहनाखाली चिरडण्याची दुर्घटना घडल्यापासून उत्तर प्रदेशातील राजकारण तप्त झाले आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला टार्गेट केले असून शेतकऱयांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लखिमपूरकडे जाणाऱया राजकारण्यांना रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्यामुळे राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होऊ लागला आहे.
राहुल-प्रियंकाच्या ताफ्यात 17 वाहने मंजूर
प्रशासनाने राहुल-प्रियांकाच्या ताफ्यातील 17 वाहनांना मंजुरी दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या दोघांसह लखिमपूर गाठले आहे. काँग्रेसचे नेते दीपेंद्र सिंह हुडा, रणदीप सुरजेवाला, केसी वेणुगोपाल आणि अजय कुमार लल्लू आदी नेतेही शेतकरी कुटुंबांना भेटण्यासाठी लखिमपूरला पोहोचले आहेत. राहुल गांधी यांना लखिमपूरला जाण्यासाठी रोखण्यात आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने काही अटींची पूर्तता करण्याची सूचना त्यांना करण्यात आली. तथापि, त्यांनी सर्व प्रशासकीय अटी मान्य करण्यास इन्कार करत धरणे आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेरीस चर्चेअंती तडजोड झाल्यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले.
सचिन पायलट मुरादाबादमध्ये ताब्यात सचिन पायलट आणि आचार्य प्रमोद कृष्णम यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. लखिमपूर येथे जात असताना योगी सरकारच्या पोलिसांनी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अज्ञात ठिकाणी नेल्याचे समजते. सुरुवातीला सचिन पायलट यांना लखिमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांना अडवण्यात आल्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला









