ऐन लॉकडाऊनमध्ये सोलापूर जिह्यातील सांगोल्याच्या संतोष जगताप या तरुण लेखकाची ‘विजेने चोरलेले दिवस’ ही कादंबरी प्रकाशित झाली. महाराष्ट्रातील शेतकऱयाच्या चिंतेचे प्रमुख कारण असणाऱया समस्यांवर मायबाप सरकारने ही कादंबरी एकदातरी वाचवीच. म्हणजे विजेच्या समस्येची तीव्रता लक्षात येईल. किमान दिवसा तरी वीज द्यायला सरकार सुरुवात करेल.
शेतकऱयांच्या मुलांनी शेतकऱयांच्या प्रश्नावर साहित्यातून आवाज उठवला पाहिजे अशी अपेक्षा करत शेतकरी नेते शरद जोशी यांनी देह ठेवला. मात्र त्यांची ही हाक फार कमी साहित्यिकांपर्यंत पोहोचली. भास्कर चंदनशिव, राजन गवस, सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, अजय कांडर यांच्या साहित्यातील कळकळ समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचली. मात्र इतर राजकीय जागल्यांचे असे आवाज साहित्याविषयीच्या अनास्थेतून स्थानिक मातीतच विरून गेले. कधीतरी नेमाडेंच्या साहित्याचा गौरव करून दुसरीकडे त्यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करावे, कधी ग्रामीण साहित्यिकांच्या साहित्यात शेती आणि शेतकऱयाला शोधावे. अशी मराठी साहित्याची वाटचाल चालू असताना दुष्काळाकडून हळूहळू सुकाळाकडे चाललेल्या सोलापूर जिह्यातील संतोष जगताप नावाचा एक शिक्षक आपल्या गावच्या आणि परिसरातल्या शेतकऱयांच्या हालअपेष्टांची कथा-व्यथा सांगायला सज्ज झाला.
त्यांच्याच नव्हे तर त्यापूर्वीच्या पिढय़ांच्याही आशा-आकांक्षांचे दिवस विजेने कसे चोरले याची कथा त्यांनी आपल्या अस्सल गावरान मराठीतून सांगायला सुरुवात केली. एकेकाची कथा व्यथा सांगता सांगता ही संपूर्ण महाराष्ट्राच्याच महाव्यथेची कादंबरी बनली. महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे. इथे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी पाणी भरते. इथली शेती सुजलाम-सुफलाम आहे. इथल्या धरणांच्या जलविद्युत, अणुउर्जा प्रकल्पांमध्ये आणि पवनचक्क्मयांच्या पात्यांमध्ये एक शक्ती विद्युत वेगाने प्रगती साधते आहे. म्हणूनच इथे खूप पिकते अशा सगळय़ा दंतकथांना खोटे पाडत संतोष जगताप यांची कादंबरी शेतकऱयाच्या चिंताग्रस्त बनलेल्या आयुष्याची सच्चाई सांगते. भारनियमन हा सर्वसामान्य शहरी माणसांना आता फारसा चिंतेचा विषय राहिलेला नाही. पण शेतकऱयासाठी कुठल्याही सरकारच्या काळात दिवसा पुरेशा दाबाने वीज मिळणे हे स्वप्नच बनले आहे. या स्वप्नांच्या मागे धावता धावता शेतकरी पुरता उद्ध्वस्त होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील जीवनाचा अंतर्विरोध आपल्या सशक्त लेखणीने मांडणारे आसाराम लोमटे संतोष जगताप यांच्या कादंबरीची पाठराखण करताना म्हणतात…. ‘सरकार म्हणाले, खूप पिकवा, उत्पादन वाढवा; तज्ञ म्हणाले, शेतीत नवे तंत्र अंगीकारा. या येरझारांमध्ये दमवणूक झाली ती शेतकऱयाची. आधुनिक शेतीत वीज हा घटक अनिवार्य. कोण नसेल तर पाण्याचे स्रोत असतानाही उभ्या पिकांची डोळय़ादेखत राखरांगोळी होताना पहावे लागते. संतोष जगताप यांच्या कादंबरीत भारनियमन हा नवाच विषय विलक्षण ताकदीने असंख्य पैलूने पहिल्यांदाच आला आहे. हवा, डोंगर या नैसर्गिक घटकांवर मालकी प्रस्थापित करून फिरणाऱया पवनचक्क्याद्वारे तयार होणाऱया विजेवर पहिला अधिकार शहरांचा. ज्यांच्या मनगटात जोर आहे, अशांनी नैसर्गिक संसाधने ओरबाडून उजेडात जगायचे आणि इतरांनी मात्र कायमचा अंधारात संघर्ष करायचा हे या कादंबरीतून ठळकपणे समोर येते.
खूप शिकूनही आजच्या व्यवस्थेत निरुपयोगी झालेल्या आणि शेतीशी झटापट करणाऱया तरुणाचे भावविश्व या कादंबरीत आले आहे. ग्रामीण या नावाखाली लिहिली जाणारी कृतक अलवार भाषा सोडून स्थानिक लोकजीवनाशी घट्ट नाते असलेल्या अस्सल रोकडय़ा, रांगडय़ा भाषेत लेखकाने हा अनुभव मांडला आहे. महात्मा ज्योतिराव फुलेप्रणीत शेतकरी साहित्य कसे असावे याचे लखलखीत उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय.’
गेल्या 8 वर्षात विजेचे उत्पादन वाढले आणि त्यामुळे शेतकऱयाची भारनियमनातून मुक्तता होईल असे वाटत होते. मात्र धोरण ठरवणाऱयाच्या चुकांनी पुन्हा चार दिवस रात्रीची आठ तास आणि तीन दिवस दिवसाची दहा तास वीज शेतकऱयाला देण्याचा उदारपणा दाखवला. रात्री संकटांची मालिका आणि दिवसा कमी दाबाने वीज. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरपासून मोटार जळण्याची साडेसाती सुरूच आहे. 45 वर्षापूर्वी ज्यांच्या शेतात कनेक्शन दिले तिथल्या तारा आणि खांबांची दुरुस्ती देखभाल नाही. तारांच्या घर्षणाने उडणाऱया ठिणग्यांनी उभे पीक पेट घेऊ लागले आहे. नुकसान भरपाई मागावी तर जिह्याला एक निरीक्षक. तो येईपर्यंत सारे पुरावे नष्ट होतात. कागदपत्र पुरवण्यातच दमछाक आणि काही हजाराच्या नुकसानीचा अपमानास्पद चेक निघतो. वाढता कर्जबाजारीपणा, मीटरचे रीडिंग तपासायला ठेका दिलेल्या ठेकेदारांनी शेतावर न येताच काढलेली अव्वाच्या सव्वा मोघम बिले आणि त्यामुळे वाढती थकबाकी, कनेक्शन मागूनही वेळेत मिळत नसल्याने पीक जगवण्यासाठी होणारी वीज चोरी, बडय़ांची अरेरावीसह वीज चोरी त्यामुळे लोड येऊन खराब होणारे टीसी, त्याच्या दुरुस्तीचा राज्यात एकाच ठिकाणी दिलेला ठेका आणि त्यामुळे शेतकऱयांनीच वर्गणी काढून स्वतः दुरुस्ती करणे, नव्या ट्रान्सफॉर्मरसाठी लाचखोरी. दुष्काळ, अवकाळी, गारपीट यामुळे होणारे नुकसान, विमा कंपन्यांनी टांग मारणे आणि त्याचवेळी सरकारकडून निम्मे वीज बिल भरण्याचे होणारे अभय योजनांचे आवाहन, वीज तोडणीची नामुष्की नको म्हणून शेतकऱयाची चालणारी धडपड, ठरावीकांना मिळणारा लाभ आणि इतर कर्जबाजारी स्थिती घेऊन शेतकरी रात्रीच्या अंधारात जीव धोक्मयात घालतो आहे. त्याच्या स्वागताला विषारी साप, नाग, जंगलातून सुटलेले हिंस्र प्राणी, खांबात उतरलेली वीज आहेच. इतक्मया संकटातून जगून दाखवच असे शेतकऱयांना देत असलेले आव्हान, दुसऱया बाजूला अणु ऊर्जेचे विक्रमी उत्पादन, एक्सप्रेस फिडरने उद्योगांना सवलतीत वीज आणि दुर्गम भागात सौर पंप देण्याबाबत किरकोळ आकडेवारीवर पाठ थोपटून घेणारी मंत्रालये… यावर तोडगा काढा असे एक साहित्यिक आपल्या कादंबरीतून ओरडून सांगतो. प्रसंगी शिव्या घालतो.
प्रसंगी सगळी आपलीच म्हणतो…. मायबाप त्याला चिंतामुक्त करा. किमान रोज वीज तरी दिवसा द्या… नाहीतर रोज एका शेतात एका शेतकऱयाची पत्नी नवऱयाला शोधत त्याला साप तर चावला नसेल, शॉक तर लागला नसेल अशी शंका घेत सैरावैरा फिरत राहील… तिला तिच्या बालगोपाळांना, वृद्ध माता-पित्यांना चिंता मुक्त करा. शिवराज काटकर








