वार्ताहर / निपाणी :
सर्व सभासदांनी विश्वासर्हता सार्थ ठरविताना संचालक मंडळाची बिनविरोध निवड केली. हाच विश्वास कायम ठेवत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी बिनविरोध होण्यासाठी सर्वच संचालक मंडळाने पाठबळ दिले. सभासद व संचालक मंडळ यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविताना शेतकऱयांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली.
चिकोडी येथे कार्यरत असणाऱया दि चिकोडी तालुका प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची संचालक मंडळापाठोपाठ अध्यक्षपदी पंकज पाटील-कोगनोळी तर उपाध्यक्षपदी महादेव बागेवाडी-एकसंबा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर ते बोलत होते.
पंकज पाटील म्हणाले, चिकोडीसह निपाणी तालुका कार्यक्षेत्र असणाऱया बँकेच्या माध्यमातून काम करत असताना सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेण्यासाठी आपले प्राधान्य राहिल. अतिवृष्टी व महापुरामुळे येथील शेतकरी संकटात सापडला असून आर्थिक अडचणीत आला आहे. अशा सर्वच शेतकऱयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ बँकेच्या माध्यमातून आपण मिळवून देणार आहे, असे सांगितले. यावेळी संचालक सुनील पाटील, सुदर्शन खोत, यशवंत मिरजी, अनिल अम्मण्णवर, किरण पाटील, सनदकुमार पाटील, प्रशांत पाटील, राजकुमार शिंदे, महादेव भोळे, जयश्री खेमलापुरे, विजयमाला वडेर, संजय कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोगनोळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोगनोळी : चिकोडी येथील पीएलडी बँकेच्या चेअरमनपदी माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील यांची निवड झाली. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. निवडीनंतर चिकोडीहून कोगनोळीत येऊन पंकज पाटील यांनी ग्रामदैवत अंबिका देवीचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांकडून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सदस्य मारुती कोळेकर, माजी ता. पं. सदस्य बाळासो कागले यांची अभिनंदनपर भाषणे झाली. यावेळी प्राथमिक पृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, संचालक जगन्नाथ खोत, दत्तगुरु पेडिट सौहार्दचे चेअरमन सचिन खोत, श्रीराम पत संस्थेचे व्यवस्थापक आप्पासाहेब माने, माजी ग्रा. पं. अध्यक्ष शनिश्वर डांगरे, सचिन माने, अशोक मगदूम, बाबासाहेब पुणेकर, बशीर गडवाले, दादासो माने, समीर मोमीन यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.









