रत्नागिरी \ प्रतिनिधी
कोकणात सर्वत्र भात कापणी पूर्ण झाली आहे. शेत आता पूर्णपणे रिकामे झाले, मात्र भात पीक घेऊन शेतकरी निवांत न बसता आपल्या शेतजमिनीला आघाडा, पुंपण करून मळ्यामध्ये अन्य हंगामी पिके घेताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी हंगामी पिकांची तयारी जोमात सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेली आर्थिक स्थिती व परिसीमा गाठलेली महागाई पाहता त्यातून थोडा बाजूला होऊन शेतकरी कुळीथ व अन्य भाजी पिक करण्यास सरसावला आहे. निसर्गाच्या कृपेने गरीब शेतकऱयांना वर्षभर पुरेल एवढं कडधान्य प्राप्त होते. त्यामुळे भातशेती पूर्ण झाल्यावर आता हंगामी पीक घेणाऱया शेतकऱयांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. महागाईच्या काळात या पिकांमुळे काही काळ शेतकऱयांच्या पोटाला आधार मिळतो.
या कालावधीत कुळीथ पिकासह, चवळी, कडवे, मूग, मटकी, वाल, मुळा, पावटा, आदी पिकांच उत्पादन घेतले जाते. यासह काही हौशी शेतकरी या शिवाय मळ्यामध्ये विषेश सुरक्षा करून कोबी, टोमॅटो, गाजर, वांगी, मका, कोथिंबीर, पालक, शेंगदाणा आदी घरगुती पिके घेतात. मात्र यासाठी जमिनीची नांगरणी करावी लागते. गेल्या काही वर्षात पशुधनामध्ये कमालीची घट झाल्याने बैलजोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे मशिनने नांगरणी करणे होय. सद्या सर्वत्र मळ्यामध्ये मशिनने नांगरणी सुरू असल्याचे आढळत आहे. मशिनने नांगरणी केल्यास वेळ आणि श्रमाची बचत होते.
कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात, जास्त चांगल्या प्रकारची नांगरणी होते. भात कापून झाल्यानंतर जमिनीच्या अंग ओलावर कुळीथ पिकासह इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. नांगरणी यंत्राद्वारे फायदेशीर कार्य होत असल्याने शेतकरी आपसूक याकडे वळत आहेत. तरुण युवक देखील आता या मशीन चालविताना दिसत आहेत.