प्रतिनिधी / कोल्हापूर
कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल तर शेतकरी सुधारणा कायद्यातून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने गुरूवारी, 11 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला टेंबे रोड येथील शेकाप कार्यालयापासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी दिली.
टेंबे रोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारत पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबुराव कदम, संभाजीराव जगदाळे, केरबा पाटील, संतराम पाटील, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते.
माजी आमदार संपतराव पवार पाटील म्हणाले, कंत्राटी शेती सुधारणा कायद्यात हमीभावाचा उल्लेख नाही. त्याला देशातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्ली सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या कायद्यामुळे ठराविक भांडवलदारांचे हित होणार आहे. साठेबाजीला उत्तेजन मिळणार असल्याने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. खुल्या बाजारात शेतकरी लुटला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे महागाई वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये वाढीव वीजबिले आली असून ती माफ केलेली नाहीत. सक्तीने वीज बिल वसुली थांबवावी, इंधन दरवाढ रद्द करा, ऊस बिले एफआरपीप्रमाणे 14 दिवसांत मिळावीत, शेतकऱ्यांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. टेंबे रोड, बिंदू चौक, शिवाजी चौक, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरमार्गे व्हिनस कॉर्नरवरून असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. मोर्चात शेतकरी, कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले आहे.









