कृष्णात चौगले / कोल्हापूर
‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून 22 मार्चच्या संचारबंदीपासून आजतागायत संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या आपत्कालिन परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्य ग्राहक भरडला जात आहे. व्यापारी व अडत्यांकडून फळे, कांदा, बटाटा व पालेभाज्यांची खरेदी कवडीमोल दराने केली जात असल्यामुळे शेतकर्यांना उत्पादन खर्चाएवढे उत्पन्न मिळणेही कठीण झाले आहे. तर शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या पालेभाज्या किरकोळ व्यापार्यांकडून जास्त दराने विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य जनतेची अर्थिक लूट होत आहे. मात्र डोळस बाजार समितीकडून गांधारीची भूमिका घेतली जात असून काही मूठभर अडते, व्यापारी गलेलठ्ठ होत आहेत.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांदा, बटाटय़ासह पालेभाज्या आणि फळांची मोठय़ा प्रमाणात आवक सुरु आहे. काही शेतकरी स्वतः माल घेऊन बाजार समितीमध्ये येतात. तर काही शेतकरी सामुहीक पद्धतीने एकाच गाडीतून अनेक शेतकर्यांचा माल बाजारसमितीमधील व्यापार्यांकडे पाठवतात. पण संबंधित व्यापार्यांकडून लॉकडाऊनचे कारण पुढे करून अगदी कवडीमोल दराने शेतीमाल खरेदी केला जात आहे. त्याचा दर किती काढायचा हे व्यापारीच ठरवत आहेत. परिणामी शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसून उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे. शासनाच्या आवाहनानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्व नागरिक घरीच थांबून आहेत. स्थानिक आठवडी बाजार देखील बंद असल्यामुळे शेतकरी उत्पादित शेतीमालाची विक्री पुरेशा प्रमाणात करु शकत नाहीत. जास्त शेतीमाल असल्यास बाजार समितीमधील व्यापार्यांकडेच तो द्यावा लागतो. शेतकर्यांच्या या अगतिकतेचा फायदा व्यापारी आणि अडत्यांकडून घेतला जात आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा जिह्यात गेल्या पंधरा दिवसात दोन ते तीन वेळा जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कलिंगड, द्राक्षे आदी फळे पिकवणारा शेतकरी धास्तावला आहे. अशा वातारणात या फळांची मागणी घटते. आगामी काळात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या फळांचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्यांनी एकाच वेळी फळांची (कलिंगड, द्राक्षे आदी) काढणी मोठय़ा प्रमाणात सुरु केल्यामुळे बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आवक झाली आहे. याचा गैरफायदा घेऊन व्यापार्यांकडून अत्यल्प किंमतीत त्याची खरेदी केली जात आहे. पण त्यानंतर किरकोळ व्यापार्यांकडून मात्र चढय़ा दराने सर्वसामान्य ग्राहकांना विक्री सुरु आहे.
कांदा, बटाटा पिकवणारे शेतकरी हवालदिल : सध्या शेतकर्यांची कांदा, बटाटा काढणी मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. कोल्हापूर जिह्यात हे पिक फारसे घेतले जात नसले तरी लासलगाव, जळगाव, नाशिक, आदी जिह्यातून बाजारसमितीमध्ये मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक होते. तर उत्तर कर्नाटकातून बटाटा येतो. कांदा, बटाटय़ाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे ते साठवण्यासाठी शेतकऱयांकडे पुरेशा गोडाऊनची व्यवस्था नाही. त्यामुळे काढणी झाल्याबरोबर त्याची त्वरीत विक्री करण्याकडे कल असतो. सध्या अनेक शेतकऱयांनी कांदा, बटाटय़ाची काढणी करून ते शेतात उघडय़ावरच ठेवले आहेत. सध्या सर्वत्रच अवकाळीचा तडाखा सुरु असल्यामुळे व्यापारी निश्चित करेल त्या दरात विक्री करण्याचा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे. पण व्यापार्यांकडून सौदा न काढताच कांदा, बटाटय़ाचा दर ठरविला जात आहे. पाच ते दहा रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जात असून त्याची होलसेल विक्री मात्र 15 तर किरकोळ विक्री 25 ते 30 रुपयांनी सुरु आहे. बटाटय़ाच्या खरेदी-विक्री प्रक्रियेतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे पोटच्या मुलांप्रमाणे पिक वाढवणाऱया शेतकर्यांच्या हातात दोन पैसे नफा शिल्लक राहणे दुरच, उत्पादन खर्चही त्यांच्या अंगावर बसत आहे.
कलिंगडाच्या पिकांवर नांगर फिरवला जातोय.कोल्हापूर जिह्यात बहुतांशी शेतकर्यांनी कलिंगडाचे पिक घेतले आहे. सध्या अनेक शेतकर्यांचे कलिंगड पिक काढणीस आले आहे. पण बाजारपेठेत नेण्यासाठी त्याचा वाहतूक खर्चही अंगावर बसत असेल, तर काय उपयोग ? असा विचार करून अनेक शेतकऱयांनी कलिंगड पिकासहीत शेताची नांगरट सुरु केली आहे.
पालेभाज्या, फळांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची गरज
जिह्यात कमी शेती असणारे बहुतांशी शेतकरी ऊस पिकाऐवजी पालेभाज्या करतात. यामध्ये दोडका, कोबी, वांगी, फ्लॉवर, काकडी, कारले आदी विविध पालेभाज्यांसह कलिंगडाचा समावेश आहे. सध्या याची काढणी मोठय़ा प्रमाणात सुरु असली तरी लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने ग्रामपंचायत पातळीवर सर्व शेतकर्यांच्या पालेभाज्या एकत्रित करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा अगोदरच अर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकर्यांच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळण्याची शक्यता आहे.