ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील शेतकऱयांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया येत्या 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा. तसेच कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीअखेरीस सुरूवात करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना दिला.
‘वर्षा’ या निवासस्थानी प्रथमच व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे झालेल्या कर्जमाफीच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील 36 लाख शेतकऱयांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱयांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ातच या प्रक्रियेच्या अंमलबजावणीला सुरूवात करावी.
येत्या 15 एप्रिलपूर्वी सर्व शेतकऱयांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यासाठी विलंब होता कामा नये. त्याचा आढावा मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. 21 फेब्रुवारीपासून कर्जमाफीच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या याद्या पाहण्यासाठी येणाऱया शेतकऱयांना सहकार्य करावे. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि काही समस्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात, अशा सूचनाही ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँकेच्या अधिकाऱयांना व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधताना केल्या.









