ऑनलाईन टीम / चंदीगड :
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीत दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाले. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने दिल्लीच्या नजदीक असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सोनीपत, पलवल आणि झज्जरमधील टेलिकॉम सर्व्हिस बंद केली आहे. या संदर्भात हरियाणाचे गृहसचिव राजीव अरोडा यांनी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, या तिन्ही जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आणि सर्व एसएमएस सेवा बंद असतील. तर केवळ व्हॉईस कॉल सेवा सुरू असणार आहे. या सर्व सेवा आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असणार आहेत. चुकीच्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच हरियाणा सरकारने आज प्रदेशातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचार लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.









