पोलिसांच्या वर्तनावर आजी-माजी आमदारांकडून आक्षेप
प्रतिनिधी/ बेळगाव
कुलवळ्ळी (ता. कित्तूर) येथील शेतकऱ्यांकडून कसणाऱ्या जमिनी आपल्या नावे करण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून शेतकऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावरून दोन्ही सभागृहात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. घटना घडल्यानंतर आंदोलनस्थळी विद्यमान मंत्र्यांसह माजी आमदारांनी भेट दिल्याने प्रकरण आणखी अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
कुलवळ्ळी गावासह परिसरातील आठ गावांमधील शेतकरी वडिलोपार्जित शेतजमीन कसत आहेत. ही जमीन शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी, यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून झालेल्या अन्यायाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती. शेकडो एकर जमीन इनामदारांच्या नावे झाल्यास शेतकऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी नावावर करून देण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच कित्तूर येथे आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र सायंकाळी 4 वाजले तरी एकही अधिकारी अथवा मंत्र्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली नाही. अथवा शेतकऱ्यांची विचारपूसही केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरून फरफटत घेऊन जाण्यात आले.
शड्डू ठोकून शेतकऱ्यांना आव्हान
आंदोलन करणाऱ्या महिला व शालेय मुलांची कोणतीच कदर करण्यात आली नाही. यामध्ये तीन शाळकरी मुलेही जखमी झाली आहेत. तर जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर रोष व्यक्त करत शड्डू ठोकून शेतकऱ्यांना आव्हान केले. पोलिसांवरही रोष व्यक्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे शेतकरी नेत्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच माजी आमदार महांतेश दोड्डू गौडर यांनी पोलिसांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या कृत्याबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांना आयते कोलीत मिळाले आहे. यामुळे हे आंदोलन आणखी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी संघटनांनीही पोलिसांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आंदोलनावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









