प्रतिष्ठेचा प्रश्न न करण्याची सरकारला सूचना
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलनावर संसदेत चर्चा करण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेची वेळ वाढवून आंदेलनावर चर्चा केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या चर्चेत 18 विरोधी पक्षांना त्यांची मते मांडण्याची अनुमती दिली जाणार असून खुलेपणाने चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
राज्यसभेत काँगेस नेते गुलाम नबी आझाद यांनी यासंबंधी निवेदन केले. नवे कृषी कायदे हा सरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नये. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. इंग्रजांनाही शेतकऱयांसमोर झुकावे लागले होते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
1906 मध्ये इंग्रजांनी शेतकऱयांविरोधात तीन कायदे करून त्यांचा स्वामित्वाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शेतकऱयांनी आंदोलन करून ब्रिटीशांना हे कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. या आंदोलनाला लाला लजपत राय यांचे समर्थन लाभले होते, असे आझाद यांनी सांगितले.
26 जानेवारीच्या कार्यक्रमात तिरंगी ध्वजाचा अपमान झाल्याची घटना ही निंदनीय आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही. असा अपमान लोकतंत्र आणि कायदा सुव्यवस्थेची अवमानना आहे. या हिंसेत सहभागी असणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी आझाद यांनी केली.
आपच्या खासदारांवर कारवाई
आम आदमी पक्षाच्या तीन राज्यसभा खासदारांवर सदनात गोंधळ माजविल्याच्या कारणास्तव कारवाई करण्यात आली. त्यांना दिवसभर सदनात बसण्यास आणि कामकाजात भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात आला. राज्यसभेच्या कारवाईचे मोबाईलमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात येत असल्याची बाब गंभीर असून हा नियमाचा भंग आहे, असा इशारा सदनाचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिला.
शेतकरी महापंचायतीचे व्यासपीठ कोसळले
हरियाणातील जिंद येथे बुधवारी शेतकरी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठय़ा प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. यावेळी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने व्यासपीठ अचानक तुटल्यामुळे राकेश टिकैत यांच्यासह इतर शेतकरी नेते खाली कोसळले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, काही वेळातच पुन्हा महापंचायतीला सुरुवात झाली.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर काही वेळातच व्यासपीठ एका बाजुला झुकले. त्यानंतर एकच गोंधळ झाल्याने समोर बसलेले शेतकरी देखील उठून उभे राहिले. मात्र, काही वेळातच व्यासपीठ व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा व्यासपीठावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात, असे म्हणत त्यांनी पुन्हा भाषणाला दमदार सुरुवात केली.
महापंचायतीत पाच ठराव मंजूर
जिंद महापंचायतीत पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे सर्व प्रस्ताव लोकांनी हात उंचावून मंजूर केले. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे तिन्ही कृषी कायदे रद्द करणे, दुसरा एमएसपीबाबत कायदा करणे, तिसरा स्वामीनाथन आयोग लागू करणे, चौथा दिल्लीमध्ये अटक केलेल्या शेतकऱयांना आणि ट्रक्टर्सना सोडणे, आणि शेतकऱयांचे कर्ज माफ करावे, या ठरावांचा यात समावेश होता.









