ऑनलाईन टीम / लंडन :
कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग आता भारताबाहेर पोहचली आहे. ब्रिटिश संसदेतील 36 खासदारांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. या खासदारांनी ब्रिटिश विदेश सचिव डोमेनिक राब यांना पत्र लिहून शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधातील हे आंदोलन उचलून धरण्याची मागणी केली आहे.
राब यांनी पत्रात म्हटले आहे, भारत सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना त्यांच्या शोषणापासून सुरक्षा पुरवण्यास आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यास कमी पडत आहेत. या कायद्यामुळे पंजाबमधील त्यांच्या परिवारातील सदस्य आणि पूर्वजांच्या जमिनीवर याचा प्रभाव पडणार आहे. ब्रिटिश शीख नागरिकांनी स्थानिक खासदारांकडे हा मुद्दा उचलून धरला आहे.
राब यांना लिहिलेल्या पत्रावर नाडीया विट्टोम, मार्टिन डोचेर्टी, पिटर बोटोमले, ॲलिसन थेवलीस, विरेंद्र शर्मा, सीमा मल्होत्रा, वेलेरी वाझ यांच्यासह अन्य खासदारांच्या सह्या आहेत. खासदार प्रिती कौर गील यांनीही भारतात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेल्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे.









