प्रतिनिधी / मिरज
नव्या तीन कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ 1 जानेवारी रोजी भीम आर्मी संघटना रेल्वे रोखणार असल्याचा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. तसे निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, मिरज-बेंगलोर राणी चेन्नमा एक्सप्रेस रोखून कृषी कायद्याचा निषेध केला जाणार असल्याची माहीती भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जैलाब शेख यांनी दिली.
दिल्लीमध्ये सध्या शेतकऱ्यांच्या कृषी विधेयका विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्याला भीम आर्मीचा पाठिंबा आहे. भीम आर्मीने यापूर्वी झालेल्या भारत बंद आंदोलनातही भाग घेतला होता. मात्र, शेतकरी आंदोलनाचा अद्याप तिढा सुटलेला नाही. केंद्र शासन कायदा मागे घेण्यास तयार नाही. आंदोलक शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रेल्वेरोखो आंदोलन केले जाणार आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभाला 1 जानेवारी रोजी मिरज-बेंगलोर राणी चेन्नमा एक्स्प्रेस रोखली जाणार असल्याचे जैलाब शेख यांनी सांगितले.