सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाने थैमान घातले असताना दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱयांचे एकत्र जमून आंदोलन सुरू आहे. ही परिस्थिती कोरोनाच्या प्रारंभापूर्वी दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्यासारखी होऊ नये, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. गुरूवारी शेतकरी आंदोलनासंदर्भात सादर करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली.
तबलिगी जमातच्या मर्कझ मेळाव्यानंतर जी स्थिती निर्माण झाली त्यापासून केंद्र सरकारने धडा घ्यावा. दिल्लीभोवती सध्या हजारो शेतकरी जमले आहेत. त्यांच्यामध्ये कोरोना पसरू नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दिल्ली सीमेवर नेमके काय चालले आहे, याची पूर्ण माहिती सरकारने आम्हाला द्यावी, अशी सूचना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांना केली. सुनावणी करणाऱया खंडपीठात न्या. ए. एस. बोपान्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रम्हणीयन यांचाही समावेश आहे. तुषार मेहता यांनी दिल्लीच्या भोवतीची स्थिती नियंत्रणा असल्याचे प्रतिपादन केले. त्यावर न्यायालयाने सरकारला मर्कझ मेळाव्याची आठवण करून देताना दक्षता घेण्याची सूचना केली.
मार्गदर्शक तत्वे घोषित करा
दिल्लीत किंवा इतरत्र मोठय़ा प्रमाणात जमाव एकत्र होऊ नये यासाठी आणि कोरोनाचा प्रसार अशा जमावात होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे घोषित करावीत अशी सूचना न्यायालयाने केंद्र सरकारला केली. सुप्रिया पंडिता यांनी या संदर्भात याचिका सादर केली आह. न्यायालयाने यासंबंधी केंद्राला नोटीस पाठविली आहे.









