चार लाखाचा ऐवज लंपास
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात चोऱयांचे सत्र वाढतच चालले आहे. जांबोटी व चिखले गावातील चोरीपाठोपाठ तालुक्यातील शेडेगाळी गावातही भरदिवसा घरफोडी करून चोरांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. शेडेगाळीतील कल्लाप्पा गुंजाप्पा गुरव यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून शुक्रवारी दुपारी चोरांनी घराच्या परसातील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरीचे कुलूप तोडून त्यामधील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने व 95 हजार रुपये रोख रक्कम पळविली आहे.
कल्लाप्पा हे कुप्पटगिरी येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्या घरची मंडळी कुलूप लावून शेताकडे गेली होती. सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी येऊन पाहिले असता चोरीची घटना उघडकीस आली. तिजोरीमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे आढळले. या संदर्भात खानापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी सहकाऱयांसह शेडेगाळीला येऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. अधिक तपासासाठी बेळगाव येथून श्वानपथक मागविले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कल्लाप्पा गुरव यांनी मुलाच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने करवून घेतले होते, असे कळते.
सध्या तालुक्यात भातकापणी हंगाम सुरू आहे. शेतकरीवर्ग घराला कुलूप लावून भातकापणीसाठी शेतात वावरतो आहे. हीच संधी साधून चोर ग्रामीण भागात भरदिवसा घरफोडय़ा करीत आहेत. जनतेने घरी दागिने व रोख रक्कम न ठेवता ती बँकेत ठेवावी, असे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे.









