इतर एक्स्प्रेसही वळविण्यात आल्या अन्य मार्गे
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर शनिवारी 7 तास उशिराने बेंगळूरहून बेळगावमध्ये दाखल झाल्याने रद्द करण्यात आली. अचानक पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. शुक्रवारी रात्री देखील बेळगाव-बेंगळूर, पंढरपूर-यशवंतपूर, मिरज-बेंगळूर या एक्स्प्रेस अन्य मार्गे वळविण्यात आल्याने रेल्वे उशिराने धावत होत्या.
हुबळी ते कुंदगोळ या दरम्यान टॉवरकार थांबल्यामुळे इतर रेल्वे पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या. शुक्रवारी रात्री धावणारी बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस गदग होस्पेटमार्गे बेंगळूरला वळविण्यात आली. पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस गदग, होस्पेट, कोट्टूरूमार्गे वळविण्यात आली. मिरज-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेसदेखील गदगमार्गे वळविण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.
बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस शनिवारी 7 तास उशिराने दाखल झाल्याने शेडबाळपर्यंत धावू शकली नाही. एकमेव असणारी पॅसेंजरदेखील रद्द झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. हुबळीपासून बेळगावला येईपर्यंत 5 ते 6 तास लागत असल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे विभागावर आपली नाराजी व्यक्त केली.
रोजच्या मार्गाने धावणाऱया एक्स्पेस नव्या मार्गाने वळविण्यात आल्याने 7 ते 8 तास उशिराने धावत होत्या. रेल्वे इतर मार्गाने वळविण्यापूर्वी सर्व व्यवस्था आहे की नाही याची पाहणी करणे गरजेचे होते. शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवासाला उशीर झाला तरी ना खाण्यापिण्याची व्यवस्था, शौचालयात पाण्याची कमतरता, सर्वत्र पसरलेली दुर्गंधी, यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.









