निफ्टी निर्देशांकही 302 अंकांनी प्रभावीत, एचडीएफसी बँक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारासाठी सोमवार ‘ब्लॅक मंडे’ ठरला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले. यामध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक घसरल्याचे दिसले. गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 3 लाख कोटी रुपये बुडाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 1023 अंकांच्या मोठय़ा घसरणीसह 57,621 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 302 अंकांच्या घसरणीसह 17,213 अंकांवर बंद झाला आहे. एचडीएफसी बँकेचा समभाग 3.65 टक्के घसरण नोंदवत बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 5 समभाग तेजीसह बंद झाले. सोमवारी सकाळी सेन्सेक्स 95 अंकांच्या घसरणीसह 58,549 अंकांवर खुला झाला होता. एल अँड टी, बजाज फायनान्स यांचे समभागही 3 टक्के घटल्याचे दिसले.
अमेरिकेतील सेंट्रल बँक व्याजदर वाढवणार असल्याची शक्यता त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरलमागे 93 डॉलरवर पोहचल्याचा परिणाम शेअर बाजारावर नकारात्मक राहिल्याचे सांगितले जात आहे. विप्रो, मारुती, एनटीपीसी आणि आयटीसी यांचे समभाग तसेच भारती एअरटेल, कोटक बँक, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह आणि इंडसइंड बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले होते.
गेली तीन सत्रे शेअर बाजारात घसरणच नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांचे आतापर्यंत अंदाजे 6.7 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. सोमवारी एकाच दिवसात 3 लाख कोटी गुंतवणूकदारांनी गमावले आहेत. विदेशी गुंतवणूकदार बाजारातून आपला पैसा काढून घेत आहेत. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 143 अंकांनी घसरून 58,644 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 44 अंकांनी घसरून 17,516 अंकांवर बंद झाला होता. जपानच्या निक्की घसरला होता, दक्षिण कोरियाचा कोस्पीही घसरलेला दिसला.








