निफ्टीत 232 अंकांची वाढ -एमएमटीसी कंपनी सर्वाधिक नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार सकारात्मक अवस्थेत बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 749 अंकांच्या वाढीसह 49849.84 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 232 अंकांच्या वाढीसह 14761.55 अंकांवर बंद झाला. एमएमटीसी कंपनीचे समभाग मात्र 20 टक्के इतके तेजीत होते.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 647.72 अंकांच्या वाढीसह तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 173 अंकांच्या वाढीसह खुला झाला होता. पहिल्या तासाभरात सेन्सेक्समध्ये 900 अंकांची वाढ दिसून आली. पण दुपारी पुन्हा सेन्सेक्स 500 अंकांसह खाली आला. फायनान्स, बँकिंग व फार्मा कंपन्यांच्या समभागांची खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली. रेलटेल व इन्फीबीम अव्हेन्युचे समभाग 17 टक्के वाढ दर्शवत होते. बाजारातील तज्ञांच्या मते गुंतवणूकदार निवडक समभागांची खरेदी करण्यावर भर देत असून त्यांना 15 ते 20 टक्के नफा होऊ शकतो.
बँकिंग क्षेत्रातील समभाग तेजीत होते. कोटक महिंद्रा 3 टक्के, ऍक्सिस बँक 2 टक्के, एचडीएफसी बँक 2 टक्के वाढीसह यांचे समभाग व्यवहार करत होते. दूरसंचार क्षेत्रात 3 टक्के घसरण राहिली. मेटल्स अँड मिनरल ट्रेडिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या समभागाचा भाव 20 टक्क्यांनी वाढला. कंपनीचा समभाग 8 रुपयांनी वाढून 48.10 रुपयांवर पोहचला होता. सोमवारी बीएसई सेन्सेक्समध्ये 3267 कंपन्यांचे समभाग व्यवहार करत होते. पैकी 1952 कंपन्यांचे समभाग तेजीत होते. 294 कंपन्यांच्या समभागांचे भाव वर्षाच्या पातळीवर सर्वोच्च स्तरावर होते.
एनएसईमध्ये गडबड
नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसईच्या व्यवहारामध्ये सोमवारी पुन्हा गडबड झाल्याची बातमी पसरली होती. एचडीएफसी सेक्युरीटीजने एनएसईमध्ये तांत्रिक अडचण आल्याचे स्पष्ट केले. काही तासानंतर व्यवहार सुरळीत झाले.








