सेन्सेक्स 62 हजारापाशी, निफ्टीतही तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजार हा विक्रमी स्तरावर खुला होत नवा इतिहास रचत बंद होण्यात यशस्वी झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी स्तर पार केला. हिंडाल्को आणि इन्फोसिस यांचे समभाग सोमवारी तेजीत होते.
सोमवारअखेर शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स 459 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 61,765.59 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 138 अंकांच्या वाढीसह 18477 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी नवी विक्रमी उंची प्राप्त करण्यात यश मिळवलं. बाजारात बँक, आयटी, वित्तसेवा, धातू, सार्वजनिक बँका, खासगी बँका यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले तर माध्यम, फार्मा आणि हेल्थकेअर निर्देशांक घसरणीत होते. निफ्टीत हिंडाल्कोचे समभाग सर्वाधिक 5.24 टक्के वाढलेले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे समभाग 4.79 टक्के इतके तेजीत होते. यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा व टाटा मोटर्स यांचे समभागही तेजीत होते. महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग मात्र सोमवारी सर्वाधिक घसरलेले पाहायला मिळाले. यासोबत एचसीएल टेक, रेड्डीज लॅब, एशियन पेंटस्, ब्रिटानिया यांचे समभागही घसरणीसह बंद झाले होते.
सकाळी शेअर बाजारात व्यवहाराची सुरूवात दमदार दिसून आली. सेन्सेक्स 61,817 अंकांवर आणि निफ्टी 18,500 अंकांवर विक्रमी स्तरावर खुला झाला. सुरूवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 523 अंकाच्या वाढीसह 61,829 अंकांवर झेपावला होता. नव्या कंपन्यांचे दमदार लिस्टिंग आणि रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग हे कारण बाजारात तेजी येण्याचे सांगितले जात आहे.








