सेन्सेक्स 415.86 तर निफ्टी 127.90 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाचा प्रारंभ मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजीने झाला आहे. मागील आठवडय़ातील शेवटच्या दिवशी नफा कमाईमुळे बाजार घसरला होता. मात्र त्या अगोदरच्या दिवशी मात्र बीएसई सेन्सेक्स तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले होते. सोमवारी पहिल्या सत्रात सेन्सेक्स 331.82 अंकांनी तर निफ्टी 105.30 अंकांनी तेजीसोबत उघडले. तसेच व्यवहारांच्या दरम्यान 750 अंकावर बाजार कार्यरत राहिला होता. दिवसअखेर सेन्सेक्स 415.86 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,743.08 वर बंद झाला. तसेच निफ्टी 127.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,282.30 वर बंद झाला.
मागील आठवडय़ात प्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिनने आपल्या सहा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा परिणाम म्हणून विमा क्षेत्रात मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण कोरोनाच्या संकटात असा कोणताही निर्णय गुंतवणूकदारांसाठी धोक्मयाची घंटा वाटते. परंतु या सर्व शंकांना आता मोकळी वाट मिळणार असल्याचे संकेत आहेत. कारण सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्युच्युअल फंड विभागासाठी 50 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार असल्याची घोषणा केली आहे. याचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बीएसईमधील बँकिंग क्षेत्रातील कोटक बँक 5.15, आरबीएल 9.16, ऍक्सिस बँक 5.74, इंडसइंड बँक 6.33, आयसीआयसीआय बँक 3.85, स्टेट बँक 0.64 आणि फेडरल बँकेचे समभाग 3.71 टक्क्मयांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.
येत्या 3 मे रोजी लॉकडाऊनचा कालावधी संपणार असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेण्याच्या सूचना सोमवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना केल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. शेअर बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.









