सेन्सेक्स 127 अंकांनी तर निफ्टी 33 अंकांच्या वाढीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 127 अंकांनी तेजी दर्शवत बंद झाला तर निफ्टीनेही 33 अंकांची तेजी दर्शवली होती. शुक्रवारी ऑटो, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातल्या समभागांच्या कामगिरीच्या जोरावर बाजाराला मजबुतता आली होती.
शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 127 अंकांच्या वाढीसह 40685.50 अंकांवर तर निफ्टीचा निर्देशांक 33.90 अंकांच्या वाढीसह 11930.35 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताच्या बळावर दोन्ही बाजार चांगली कामगिरी पार पाडत होते. सेन्सेक्समध्ये मारुती सुझूकी कंपनीचे समभाग सर्वाधिक 4 टक्क्याने वाढल्याचे दिसून आले. यासह महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टील, पॉवरग्रीड कॉर्प, बजाज ऑटो आणि एनटीपीसी यांच्या समभागांनीही तेजी दर्शवली. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, एचयुएल, हिंडाल्को, गेल आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग घसरण नोंदवत बंद झाले. शुक्रवारी रियल्टी क्षेत्रातल्या समभागांनी एक टक्क्यापर्यंत घसरण नोंदवली तर खाजगी बंका आणि फार्मा उद्योगातले समभागही नुकसानीसह बंद झाले. ऑटो क्षेत्रातल्या समभागांनी जवळपास 3 टक्क्यांची वाढ दर्शविली. निफ्टी 50 समभागांमधील 29 समभाग नफ्यासह आणि 21 समभाग नुकसानीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 19 समभागांनी तेजी तर 11 समभागांनी घट दर्शविली. जागतिक स्तरावर सकारात्मक वातावरण तयार झाल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर सकारात्मक दिसला. आशियातील बाजारांमध्ये चीनचा हाँगकाँग, जपानचा टोकीयो आणि दक्षिण कोरियाचा सोल तेजी दर्शवत बंद झाले. मात्र चीनचा शांघाई बाजार घसरण नोंदवत बंद झाला. सुरुवातीच्या सत्रात युरोपातील प्रमुख बाजारांमध्ये तेजी राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर 0.38 वाढीसह 42.62 डॉलर प्रति बॅरलवर राहिला होता.








