सेन्सेक्स 189 तर निफ्टी 45 अंकांनी घसरल
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात आठवडय़ाचा पहिला दिवस निराशादायी ठरला. रिलायन्स व आयटी समभागांच्या विक्रीमुळे सेन्सेक्सचा निर्देशांक 189 अंकांनी आणि 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 45 अंकांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.
सेन्सेक्स निर्देशांक 189 अंकांनी घसरत सरतेशेवटी 52,735.59 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 45 अंकांच्या घसरणीसह 15,814.70 अंकांवर बंद झाला. भारतीय शेअर बाजाराची सोमवारी सुरुवात तेजीने झाली खरी पण दुपारच्या सत्रात मात्र सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक तेजी गमावून बसल्याचे दिसून आले. टेक व खासगी बँकांच्या कमकुवत कामगिरीचा परिणाम घसरणीवर झाला आहे. सेन्सेक्स 100 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 53,126 हजारवर खुला झाला तर 50 समभागांचा निफ्टीदेखील 55 अंकांच्या वाढीसह 15915 अंकांवर खुला झाला. निफ्टीत मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र तेजीत होता. दोन्ही निर्देशांक अर्धा टक्के तेजी राखून होते. सार्वजनिक बँक, धातू व फार्मा यांनी 1 टक्के इतकी उसळी घेतली होती. आयटी व मीडिया समभागांबाबत मात्र विक्रीचा दबाव दिसला. ओएनजीसी, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज लॅब, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड व एशियन पेंटस् या मजबूत समभागांचा बाजाराला चांगला आधार प्राप्त झाला. कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेज व डोडला यांचे समभाग शेअर बाजारात लिस्ट झाले. टायटन व टीसीएस मात्र घसरणीत प्रवास करत होते.
मुंबई शेअर बाजारात पॉवर मेक प्रोजेक्टस्च्या समभागाने 15 टक्के विक्रमी उसळी घेतली होती. 52 आठवडय़ाच्या सर्वोच्च पातळीवर समभागाचा भाव 767 वर व्यवहार करत होता.
आशियाई बाजारात मात्र सोमवारी सुस्ती दिसून आली. जपानचा निक्की निर्देशांक 0.10 टक्के कमकुवत झाला होता. तर हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाई कंपोझीट व कोरीयाचा कोस्पी 0.05 टक्के घसरणीत होता.