सेन्सेक्स 633 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 193 अंकांची घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक समभाग बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर दिसून आला. बाजारात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 633 अंकांनी घसरून निर्देशांक 38,357 वर बंद झाला तर दुसरीकडे निफ्टीचा निर्देशांक 193 अंकांनी घसरून 11,333.85 वर बंद झाला. आठवडय़ाचा शेवटी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
सुरूवातीच्या वेळी सेन्सेक्स 600 अंकांनी खाली कोसळला होता. शेवटपर्यंत हाच ट्रेंड दिसून आला. गुंतवणूकदारांची मात्र आज निराशा झाली. एकावेळी सेन्सेक्स 615 अंकांच्या घसरणीसह 38,375.24 अंकांवर होता तर निफ्टी 170 अंकांच्या घसरणीसह 11,357 अंकांवर होता. सेन्सेक्समध्ये शुक्रवारी मारूतीच्या समभागांमध्ये 1.70 टक्के तेजी दिसली. यात इतर कंपन्यांनी मात्र घसरणीचाच अनुभव नोंदवला. एसबीआय, ऍक्सिस बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि एचसीएल टेक यांच्या समभागातही घसरण झाली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटचा शेअर बाजार मोठय़ा नुकसानीसह बंद झाला. ऍपलच्या समभागातही 8 टक्के इतकी घसरण झाली आहे. आशियाई बाजारही नुकसानीसह व्यवहार करताना दिसले. गुरूवारी बँकांच्या समभागांमध्ये घसरण झाल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारात घसरण अनुभवाला मिळाली होती. गुरूवारी सकाळी सेन्सेक्स तेजीसह सुरू झाला होता पण अंतिम क्षणी घसरणीसह दोन्ही बाजार बंद झाले हेते. गुरूवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 7.72 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
शुक्रवारी धातु, रिअल इस्टेट, आयटी, फार्मा, एफएमसीजी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. ऑइल आणि गॅस, टेक, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही कमकुवत दिसून आले. बाजारात 49 कंपन्यांच्या समभागांनी घसरणीची नोंद केली आहे. सेन्सेक्समधील 29 कंपन्यांचे समभागही घसरणीसह बंद झाले. संपूर्ण आठवडय़ाचा विचार करता सेन्सेक्स 2.8 टक्के इतका घसरला असून निफ्टी 2.6 टक्के इतका घसरला आहे.








