सेन्सेक्सने गाठली 46 हजारची पातळी, निफ्टीही 13,500 पार
वृत्तसंस्था / मुंबई
मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 46 हजारापेक्षा जास्त मजल मारून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बुधवारी दिवसअखेर हा निर्देशांक 495.48 अंकांच्या वधारासह 46,104.24 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.78 अंकांच्या वाढीसह दिवसअखेर 13,529.18 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही भरीव वाढ झाली.
मुंबई शेअरबाजारात बुधवारच्या व्यवहारात एशियन पेंटस्, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, ऍक्सिस बँक आणि रिलायन्स या कंपन्यांच्या समभागांच्या दरांमध्ये भरघोस वाढ दिसून आली. ती सरासरी 3.59 टक्के होती. राष्ट्रीय शेअरबाजारातही सर्व क्षेत्रांमधील कंपन्यांचे समभाग वधारल्याचे दिसून आले. हा अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा संकेत मानला जात आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी 2,909.60 कोटी रूपयांच्या समभागांची खरेदी केली. भारतीय कंपन्यांनी आता मंदीचा काळ मागे टाकल्याचे दिसत असून त्यांच्या नफ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थैर्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बळावला आहे. याचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणूकदार अधिक प्रमाणात आकर्षित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक बाजार तज्ञांनी व्यक्त केली.
कोरोना लस उपलब्धतेचा परिणाम
लवकरच भारतीयांना कोरोनाची लस उपलब्ध होईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट अल्पावधीत दूर होईल अशी शक्यताही निर्माण झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअरबाजारांवर होत असून त्यामुळे छोटय़ा गुंतवणूकदारांकडूनही गुंतवणूक वाढत आहे.
ब्रिटनने लसीकरणाचा कार्यक्रम धडाक्याने सुरू केल्याने जागतिक शेअरबाजारांमध्येही उत्साहाचे वारे वाहू लागले आहे.









