1,747 अंकांची घट, निफ्टीचीही घसरगुंडी ः टीसीएस वगळता इतर सर्व कंपन्यांच्या समभागांना फटका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोमवार हा भारतीय शेअरबाजारांसाठी घातवार ठरला आहे. मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाची तब्बल 1,747 अंकांनी घसरण झाल्याने अनेक गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही प्रचंड घसरण झाली आहे. ही घसरण व्यापक आणि सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी होती. मुंबई शेअरबाजाराच्या 30 मुख्य कंपन्यांपैकी केवळ टीसीएसचा अपवाद वगळता इतर सर्वांचे समभाग कमी-अधिक प्रमाणात घसरले. एकंदर या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना दिवसभरात जवळपास 10 लाख कोटींहून अधिक तोटा झाल्याचे अर्थतज्ञांकडून सांगण्यात आले.
रशिया आणि युपेन यांच्यात युद्धाचा भडका उडण्याच्या शक्यतेने शेअरबाजारांमध्ये घबराट पसरल्यामुळे ही प्रचंड घसरण झाली, असे स्पष्ट करण्यात आले. ही घसरण जगभरातील शेअरबाजारांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या घसरणीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 56,504.84 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीला 16,842.80 च्या पातळीवर समाधान मानावे लागले.
टाटा स्टीलला सर्वाधिक 5.49 टक्के घसरणीचा फटका बसला. याशिवाय बँकिंग क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्र आणि इतर सर्व क्षेत्रांना चिंता वाटावी अशी ही घसरण आहे. शेअरबाजाराच्या सर्व 19 क्षेत्रांमध्ये घसरण झाली असून बांधकाम, धातू आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये हे प्रमाण प्रत्येकी पाच टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.
अनेक कारणे
रशिया-युपेन युद्धाच्या शक्यतेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या दरात होत असलेली वाढ, अमेरिकेच्या फेडरल बँकेने आयोजित केलेली तातडीची बैठक आणि या बँकेकडून व्याजदर वाढविले जाण्याची भीती, तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली विक्री अशा अनेक कारणांनी शेअरबाजारांना ही प्रचंड हानी सोसावी लागली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
विदेशातील स्थिती कारणीभूत
भारताच्या शेअरबाजारांवर आता विदेशातील परिस्थितीचा पगडा बसू लागला आहे, अशी प्रतिक्रिया काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव तसेच त्या तणावाचे युद्धात रुपांतर होण्याची शक्यता यामुळे जागतिक गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्यांनी धोक्याच्या छायेत असलेल्या देशांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा किंवा ती कमी करण्याचा सपाटा लावला आहे. भारताची आर्थिक स्थिती सुस्थिर असली तरी जागतिक वातावरणाचा परिणाम भारतावर होणार हे निश्चित आहे. भारताची अर्थव्यवस्थाही आता जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडली गेल्याने हे सहन करण्याची तयारी ठेवावयास हवी, असेही प्रतिपादन काही कंपन्यांच्या अधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना केले.
छोटय़ा कंपन्यांवरही परिणाम
मुख्य कंपन्यांप्रमाणेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांवरही या घसरणीचा विपरीत परिणाम झाला. शेअरबाजाराचे या कंपन्यांशी संबंधित निर्देशांक प्रत्येकी 4.15 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिकच वाढली आहे. परिणामी, या घसरणीचे पडसाद आणखी काही काळ उमटत राहणार आहेत.
आशियासह जगात घसरण
जागतिक परिस्थितीचा आणि युद्धाच्या शक्यतेचा परिणाम भारताच्याच नव्हे तर जगाच्या शेअरबाजारांवर झाला आहे. आशियातील जपान, चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया आदी सर्व शेअरबाजारांची स्थिती भारताप्रमाणेच झाल्याचे दिसून आले आहे. रशिया कोणत्यातरी निमित्ताने युक्रेनमध्ये घुसखोरी करेल, अशी चिंता अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी वारंवार बोलून दाखविली आहे. त्याचाही परिणाम गुंतवणूकदारांच्या नीतीधैर्यावर झालेला आहे. असे बाजारांचा कानोसा घेणाऱया पत्रकारांचे आणि अर्थतज्ञांचे म्हणणे असल्याचे स्पष्ट होत आहे.
घातवाराच्या फटका
ड शेअरबाजारातील प्रचंड घसरणीचा सर्व क्षेत्रांना मोठा फटका
ड बँकिंग क्षेत्राची सर्वाधिक हानी, बांधकाम क्षेत्रालाही फटका
ड जागतिक परिस्थितीचा, युद्धाच्या शक्यतेचा घातक परिणाम
ड गुंतवणूकदारांनी परिस्थिती पाहून सावध निर्णय घेण्याचा सल्ला
ड युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न









