प्रतिनिधी / सातारा :
वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशान्वये शाहूपुरी पोलीसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत शाहूपुरी हद्दीत राहणारा पिल्या उर्फ विजय राजू नलवडे (वय 30) रा. मंगळवार पेठ यांच्या विरूद्ध करवाई केली. हा सराईत गुंड शेंबडा राजा उर्फ राजु नलवडे याचा मुलगा आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्या उर्फ विजय राजू नलवडे या इसमाने दरोडा, जबरी चोरी, खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवणे, लोक सेवकांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करणे. धाक दाखवणे, गंभीर दुखापत, हमला करण्याची पुर्वतयारी करून गृह अतिक्रमण करणे, असे गुन्हे केले आहेत. यांच्याकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होणारी कृत्ये करण्यात आल्याने बुधवारी त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश काढून शाहूपुरी पोलिसांनी त्याला सातारा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले.









