वार्ताहर / पाचगाव
शेंडा पार्क येथे ऑक्सिजन पार्क मधील गवत वाळले असून यामुळे येथील हजारो झाडांना आगीचा धोका निर्माण झाला आहे. या शेंडा पार्कमध्ये सुमारे 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत. मागील वर्षी या झाडांमधील गवत वाळले होते. या गवताला आग लागून त्यामध्ये सुमारे वीस हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. आमदार ऋतुराज पाटील, आणि काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत या झाडांना टँकरद्वारे पाणी घातले होते. तसेच झाडे जगवण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांना ही झाडे दत्तक दिली होती. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या झाडांना पुन्हा एकदा पालवी फुटली होती.
यावर्षी पुन्हा एकदा या झाडांमध्ये गवत वाढलेले गवत आता वाळले आहे. या वाळलेल्या गवताला आग लागून येथील झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आर के नगर मोरेवाडी रस्त्याशेजारी पेट्रोल पंपाजवळ कचऱ्याचे प्रचंड मोठे ढीग पडले आहेत .हा कचरा नेहमी जळत असतो. या जळणाऱ्या कचऱ्यामुळे मागील वर्षी गवताला आग लागली होती. आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यावेळी महानगरपालिका आयुक्तांना तात्काळ सूचना देऊन येथील सर्व कचरा हटवला होता. या वर्षी पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. येथील जळणाऱ्या कचऱ्यामुळे गवतास आग लागून पुन्हा एकदा झाडे भस्मसात होण्याचा धोका आहे. त्यामुळे या परिसरातील वाळलेले गवत तात्काळ कापावे आणि येथील कचरा हटवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत पुन्हा ऑक्सिजन पार्क आगिच्या भक्ष्यस्थानी पडण्याची वाट पाहते आहे का असा ही नागरिकातुन सवाल उपस्थित केला जात आहे.
Previous Articleआज मध्यरात्रीपासून सातारा विभागातील एसटी कर्मचारी संपावर
Next Article स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड









