माहिती व प्रसार यंत्रणेच्या अत्याधुनिक युगात ‘गुगल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे महत्त्व असाधारण आहे. किंबहुना, या यंत्रणेचा ‘गुगल’ हा अग्रदूत आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गुगलच्या आधारे माहितीचे दालन अगदी सहजगत्या जगाच्या कानाकोपऱयात ज्या पद्धतीने खुले झाले आहे त्यासाठी सारे जग या माध्यमाचे ऋणी आहे. तथापि, हे सारे ‘मनोहर’ असले तरी या जगडव्याळ कंपनीचा कारभार सांभाळताना प्रशासकीय तसेच कार्यकारी पातळीवर काही अस्वस्थ करणाऱया घटना घडत आहेत आणि त्यामुळे कंपनीच्या दर्शनास गालबोट लागत आहे. या संदर्भात परवाच घडलेली एक घटना लक्षणीय आहे. कारण सदर घटनेमुळे काम करणाऱया महिलांची स्थिती, कामगारवर्गाचे कंत्राटीकरण, महिलांचा संघर्ष, कामगार संघटनांची गरज, न्यायालयाची भूमिका, कामाच्या जागेची स्थिती व वातावरण या अनेक पैलूंवर एकाचवेळी प्रकाश पडतो. ही घटना गुगलचा बालेकिल्ला असलेल्या अमेरिकेतील आहे.
शॅनॉन नावाची एक तरुणी 2018 साली इतिहास या विषयात पदवी घेऊन दक्षिण कॅरोलिना भागातील गुगल डेटा सेंटरमध्ये तासास 15 डॉलर्स वेतनावर त्याच वषी फेब्रुवारी महिन्यात रुजू झाली. तेथे सर्व्हर्स जोडणीचे काम तिच्यावर सोपविण्यात आले होते. या निमित्ताने हार्ड ड्राईव्हज, मदर बोर्ड्सच्या अदलाबदलीसह साडेतेरा किलोच्या बॅटरीज उचलण्याचे कामही तिला सातत्याने करावे लागे. ‘गुगल’मध्ये मोठय़ा प्रमाणात कंत्राटी कामगारांची प्रथा आहे. शॅनॉनदेखील ‘मुडीज’ या कंपनीकडून कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाली होती. त्यानंतर कोरोना साथीचे आगमन झाले आणि कामाचा बोजा कंपनीने अधिकच वाढविला. पण कामगारांना दिलासा म्हणून 2020 मे मध्ये कंपनीने कंत्राटी कर्मचाऱयांसह साऱया कर्मचाऱयांना बोनस देण्याचे जाहीर केले. मात्र, कंपनीने जाहीर केलेल्या वेळेत बोनस काही कर्मचाऱयांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱयांत चलबिचल होऊन बोनसबाबत चर्चा होऊ लागली. शॅनॉननेही स्वाभाविकपणे बोनसबाबत सहकाऱयांना विचारणा केली. हे जेव्हा व्यवस्थापकांच्या ध्यानात आले तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱयांसह त्या संदर्भात चर्चा करू नये, असे पत्रच तिच्या हाती दिले.
बोनसबद्दल कर्मचाऱयात अस्वस्थता वाढली आणि अखेर वेळाने का होईना साऱयांना तो देण्यात आला. मात्र, अनेकदा विनंत्या करून, आवश्यक ती कार्यक्षमता दर्शवूनही शॅनॉनला कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचाऱयाचा दर्जा नाकारण्यात आला. व्यवस्थापनाच्या नकारघंटेमुळे ती वैफल्यग्रस्त बनली. भविष्याबद्दलची चिंताही तिला सतावू लागली. तशातच या साऱया उदेकाचा स्फोट करणारी घटना घडली. घटना नाममात्र असली तरी शॅनॉनच्या मनातील खदखदीला ती मोकळी वाट करून देणारी ठरली. डेटा सेंटरमधील वातावरण साधारण 30 डिग्री सेंटीग्रेड इतके गरम असते. साहजिकच या वातावरणात काम करणाऱया कर्मचाऱयांना सतत पाण्याची गरज भासते. अशावेळी व्यवस्थापनातर्फे पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जातात. शॅनॉनच्या मागणीवरून जी बाटली तिला पुरवण्यात आली तिचे झाकण मोडलेले होते. तिच्या सहकाऱयाच्या वाटय़ासही अशीच मोडकी बाटली आली. सहकाऱयास ती बदलून दुसरी देण्यात आली. मात्र, शॅनॉनला नवी नाकारण्यात आली. त्यानंतर ती घरी गेली आणि ‘मला हे सारे असहय़ झाले आहे’ असा संदेश तिने आपली कहाणी थोडक्मयात कथन करून फेसबुकवर टाकला. दुसरे दिवशी तिला व्यवस्थापकांच्या कार्यालयात बोलावून घेतले गेले. जिथे वेगवेगळय़ा विभागांचे व्यवस्थापकही हजर होते. बैठकीत तिला सांगण्यात आले, की ‘तिच्या फेसबुक संदेशाने गुप्ततेच्या कराराचा भंग झाला आहे. त्यामुळे तिने तात्काळ कंपनीचा बिल्ला आणि तिला दिलेला लॅपटॉप संबंधितांच्या हवाली करावा. कंपनीने तिला घरी सोडण्याची व्यवस्थाही केली आहे.’ नोकरीवरून काढून टाकल्याची ही उघड कृती होती. तिने यानंतर तातडीने ‘अल्फाबेट वर्कर्स युनियन’ या जानेवारी 2021 मध्ये स्थापन झालेल्या टेड युनियनकडे तक्रार दाखल केली. या छोटय़ा युनियनचे बहुसंख्य गुगल कर्मचारी सदस्य नव्हते. मात्र, शॅनॉनने सदस्यत्व मिळवले होते. अल्फाबेट युनियनने शॅनॉनतर्फे ‘कामगारवर्गास विपरीत वागणूक कायद्याखाली’ कंत्राटदार आणि गुगल व्यवस्थापनावर दोन खटले दाखल केले. बेकायदेशीर बडतर्फी आणि बोनस पगाराविषयी चर्चा न करता मौन पाळणे हे दोन मुद्दे त्यात अधोरेखित केले होते. न्यायव्यवस्थेने चौकशीअंती शॅनॉनच्या बाजूने निकाल दिला. गुगलला तिच्या बडतर्फीचा निर्णय रद्द करावा लागला. शिवाय ‘कर्मचाऱयांना वेतन, बोनस, कामाच्या ठिकाणचे वातावरण याबद्दल बोलण्याचा, चर्चा करण्याचा अधिकार आहे’ हे सांगणाऱया पत्रकावर स्वाक्षरी करून मान्यता जाहीर करावी लागली. गुगल ही महाकाय कंपनी असली तरी तेथील साऱयाच कर्मचाऱयांना काही सहा आकडी पगार नसतो. तेथे काम करणे प्रति÷sचे मानले जात असले तरी कर्मचाऱयांचा आत्मसन्मान, माणूस म्हणून प्रति÷ा व स्वातंत्र्य जपले जाईलच, याचीही शाश्वती नसते, हे शॅनॉनच्या कथेवरून स्पष्ट होते. दरम्यान, या साऱया प्रकाराने मनःस्ताप झालेल्या शॅनॉनने कंपनी विरुद्ध विजय मिळवूनही तेथे पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतिहासात पीएचडी करण्यासाठी इथून पुढे ती प्रयत्नशील आहे.
अमेरिका असो वा जगातील इतर प्रगत देश असोत. प्रगत भांडवलशाही व्यवस्थेत कर्मचाऱयांचे वेतन आणि नफा याचा मेळ जमवून नफ्याचे आकडे वाढविण्यासाठी कर्मचाऱयांच्या न्याय्य हक्कावरच आघात केला जातो. कंत्राटी कामगार पद्धत, ट्रेड युनियन्सना बंदी, कामगार कायद्यात सुधारणा इत्यादी माध्यमांचा वापर करून एकीकडे कामाच्या तुलनेत वेतन व इतर सुविधा संकुचित केल्या जातात आणि दुसरीकडे नफा वाढविला जातो. कामगारवर्ग हा नफा आणि भांडवल निर्माण करणारा प्रमुख घटक आहे, हे मूलभूत तत्त्वच अलीकडे बाजूला सारले गेले आहे. अलीकडेच मूळ अमेरिकेत असलेल्या ‘ऍमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीतील अमेरिकन कर्मचाऱयांनी टेड युनियन उभारण्याचा, त्याचे सदस्य होण्याचा अधिकार आम्हाला द्या, अशी मागणी केली आहे. जवळपास 800 प्रकारच्या सेवा पुरवणाऱया या कंपनीत अमेरिकेत 9 लाख 50 हजार पूर्णवेळ व अर्धवेळ कर्मचारी आहेत. वेतन ही त्यांची प्रमुख तक्रार नसली तरी कामाच्या स्वरुपामुळे जडणाऱया व्याधी, कामावरील वातावरण, कामावरील मानसिक व शारीरिक ताणाचे स्वरुप, रोजगाराची शाश्वती याबद्दल न्याय मिळत नाही, अशा त्यांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या संघटित होण्याच्या मागणीचा निर्णय कामगार मंत्रालय व न्यायालय येत्या काळात घेणार आहेत.
अनिल आजगावकर, मोबा.9480275418








