आज कारवाई, प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता नाही
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता नसलेले कांदोळी, कळंगूट किनाऱ्यावरील शॅक बंद करण्याची मोहीम आज सोमवार दि. 3 पासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण 9 पथकांची नियुक्ती केली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ही कारवाई सुरू होणार असून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
उपरोक्त दोन्ही समुद्रकिनारी मंडळाची मान्यता नसलेले शॅक बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचे पालन करण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून 9 पथके सज्ज ठेवली आहेत. कळंगूट, कांदोळी समुद्रकिनारी 161 शॅक ‘कन्सेंट टू ऑपरेट’ हा मंडळाचा परवाना नसताना चालू असल्याची माहिती मंडळातर्फेच उच्च न्यायालयासमोर एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी सादर केली होती. त्या शॅकना बंदीचा आदेश देऊनही ते चालूच असल्याचे मंडळाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने ते बंद करण्याचा आदेश दिला आहे.

कारवाईचा अहवाल 5 रोजी
दरम्यान अनेक शॅकमालक, चालकांनी गोवा प्रदूषण मंडळाकडे परवान्यासाठी धाव घेतली असून अर्ज करणे चालू केले आहे. इतर समुद्रकिनारी असलेले परंतु मंडळाचा परवाना नसलेले शॅक शोधून काढण्यास न्यायालयाने बजावले असून ते काम आता मंडळाला करावे लागणार आहे. कारवाईचा अहवाल 5 एप्रिल रोजी सादर करण्यास न्यायालयाने मंडळाला बजावले असून त्यासाठीच कांदोळी-कळंगूट समुद्रकिनारी आज सोमवारपासून विनापरवाना शॅक बंद करण्याची धडक कारवाई सुरू होणार असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
या कारवाईच्या निर्देशामुळे गोव्यातील सर्व समुद्रकिनारी चालू असलेल्या शॅक चालक, मालकांचे धाबे दणाणले असून आतापर्यंत सुमारे 50 जणांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत.
आजच्या कारवाई पथकात मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस, व त्यांचे कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे मंडळाचा परवाना नाही ते शॅक या मोहिमेत बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.









