शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची खासगी शाळांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील विद्यार्थ्यांनी शालेय शुल्क भरले नाही, या कारणावरून त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग बंद करू नये. अन्यथा अशा शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिला आहे.
राज्यातील कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही, या कारणावरून त्यांना ऑनलाईन वर्गापासून वंचित ठेवू नये. एखाद्या वेळेस अशा तक्रारी दाखल झाल्यास संबंधित शाळेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱया शाळांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली आहे. शिवाय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने देखील यासंबंधीचे निर्देश दिल्याचे सुरेशकुमार म्हणाले.
शाळेचे शुल्क न भरल्याच्या कारणावरून मुलासाठी ऑनलाईन वर्ग बंद करणाऱया शाळेविरुद्ध पालकांनी तक्रार दाखल करावी. आपल्याकडे किंवा संबंधित भागातील गटशिक्षणाधिकाऱयांकडेही तक्रार करता येईल, असे त्यांनी सांगितले.









