ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवसआहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका. कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करु नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत हे आवाहन केले आहे.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका ही आपणा सर्वांना विनंती करतो. सध्या बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत.
पुढे ते म्हणाले, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
धनंजय मुंडे यांना सकाळपासूनच अनेक बड्या नेत्यांनी ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी यावर यशस्वीरित्या मात केली आहे.









